३,००० मेगावॅटच्या जलविद्युत प्रकल्पासाठी वृक्षतोडीचा मुद्दा ऐरणीवर; वृक्षलागवडीऐवजी कंपनीने ३ कोटी ८४ लाख रुपये दिल्याचा आरटीआय कार्यकर्त्याचा दावा
रायगड : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रस्तावित असलेल्या टोरंट पॉवरच्या जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पावरून महाराष्ट्रातील राजकीय आणि पर्यावरणविषयक चर्चा तीव्र झाली आहे. या प्रकल्पाच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी यासंदर्भात गंभीर आरोप केले आहेत. भीमाशंकर जंगल परिसरात ३४ हजार नव्हे, तर तब्बल ९० हजार झाडे तोडली जाणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यासोबतच राज्यातील अन्य २३ प्रकल्पांसाठीही वेगवेगळ्या ठिकाणी लाखो झाडे तोडली जाण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
विजय कुंभार यांनी या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर प्रसिद्ध केली आहेत. त्यामुळे प्रस्तावित प्रकल्पासाठी होणारी वृक्षतोड आणि पर्यावरणीय परिणामांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
साईडोंगर हा एकमेव प्रकल्प नाही; महाराष्ट्रात असे तब्बल २३ पंप्ड स्टोरेज प्रकल्प प्रस्तावित आहेत! मग प्रत्येक ठिकाणी जनतेने आंदोलन करायचे आणि सरकारने प्रकल्पांचे समर्थन करायचे का? प्रत्येक भागाची भौगोलिक, सामाजिक आणि पर्यावरणीय परिस्थिती वेगळी आहे. पण सरकारला त्याचं काही देणंघेणं आहे की नाही? पर्यावरणाचा विचार न करता प्रकल्पांना पाठिंबा द्यायचा आणि जनतेला विनाशाच्या उंबरठ्यावर आणून ठेवायचं, हाच सरकारचा विकास आहे का? कंपन्यांच्या हितासाठी सरकारचा एवढा अट्टाहास, मग निसर्ग आणि जनतेच्या हितासाठी एवढीच तळमळ का नाही? प्रश्न एका साईडोंगरचा नाही; प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राच्या भवितव्याचा आहे! #SaveSaidongar #SaveWesternGhats #पर्यावरण_वाचवा #SayajiShinde #SaveNature
— Vijay Kumbhar (@VijayKumbhar62) October 27, 2026
वृक्षतोडीच्या बदल्यात लागवडीचे आश्वासन; प्रत्यक्षात झाडे लावली नसल्याचा दावा
भीमाशंकर परिसरातील वृक्षतोडीची भरपाई म्हणून टोरंट पॉवर कंपनी कोयना धरण परिसरातील दोन गावांमध्ये वृक्षलागवड करणार असल्याचे सांगण्यात आले होते, असा दावा विजय कुंभार यांनी केला आहे. मात्र, प्रत्यक्षात अद्याप एकही झाड लावण्यात आले नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
वृक्षलागवड करण्याऐवजी कंपनीने त्यासाठी ३ कोटी ८४ लाख रुपये दिले आणि जबाबदारीतून हात झटकले, असा दावा कुंभार यांनी केला आहे. या आरोपांमुळे वृक्षतोडीच्या बदल्यात पर्यावरणाची भरपाई नेमकी कशा पद्धतीने केली जात आहे, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
कर्जत तालुक्यातील टोरंट पॉवर प्रकल्प नेमका काय आहे?
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील साईडोंगर-१ परिसरात टोरंट पॉवर कंपनीचा पंप-स्टोरेज जलविद्युत प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पाची क्षमता सुमारे ३,००० मेगावॅट असून, त्यासाठी अंदाजे १३ हजार ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.
हा प्रकल्प पंप-स्टोरेज हायड्रोइलेक्ट्रिक तंत्रज्ञानावर आधारित आहे. विजेची निर्मिती करणे आणि अतिरिक्त ऊर्जेचा साठा करून गरजेनुसार तिचा वापर करणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.
कंपनीच्या दाव्यानुसार, प्रस्तावित प्रकल्पाचे ठिकाण भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यापासून सुमारे १६ किलोमीटर अंतरावर आहे. मात्र, या प्रकल्पासाठी होणाऱ्या वृक्षतोडीच्या संभाव्य प्रमाणामुळे आणि वृक्षलागवडीच्या दाव्यांमुळे पर्यावरणीय परिणामांचा मुद्दा महत्त्वाचा ठरला आहे.
२३ प्रकल्पांमधील वृक्षतोडीचाही दावा
विजय कुंभार यांनी केलेल्या दाव्यानुसार, भीमाशंकर परिसरातील प्रस्तावित वृक्षतोड ही एकमेव बाब नसून, राज्यातील आणखी २३ प्रकल्पांसाठी २३ वेगवेगळ्या ठिकाणी लाखो झाडे तोडली जाण्याची शक्यता आहे. या दाव्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित प्रकल्पांमधील वृक्षतोड, पर्यावरणीय परिणाम आणि भरपाई म्हणून होणारी वृक्षलागवड याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
कर्जत तालुक्यातील टोरंट पॉवर प्रकल्पाची क्षमता, गुंतवणूक आणि पर्यावरणीय परिणाम यांमुळे हा प्रकल्प चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. विजय कुंभार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांमुळे वृक्षतोडीचे प्रमाण, वृक्षलागवडीची अंमलबजावणी आणि संबंधित कागदपत्रांतील तपशील याबाबत अधिक स्पष्टता येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.