प्रकल्पासाठी २३३ हेक्टर जमीन आवश्यक; कंपनीने २५३ हेक्टर जमीन वन विभागाला दिल्याचा निकम यांचा दावा
रायगड : कर्जत तालुक्यातील प्रस्तावित टोरेंट पॉवर पंप-स्टोरेज प्रकल्पावरून सुरू असलेल्या राजकीय आणि पर्यावरणीय चर्चेत भाजपचे खासदार, ज्येष्ठ विधिज्ञ आणि विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांनी भूमिका मांडली आहे. हा प्रकल्प पर्यावरणाला पूरक असून, त्याबाबत काही गैरसमज पसरवले जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
कर्जतच्या सायडोंगर आणि पाली खलाटी परिसरात प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमींनी केला आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली. त्यानंतर निकम यांनी प्रकल्पाचे स्थान, परवानग्या आणि पर्यावरणीय परिणामांविषयी माहिती दिली.
कर्जत पंप स्टोरेज प्रकल्प हा पर्यावरणाला पूरक असाच प्रकल्प काय आहे वस्तुस्थिती? - हा गुजरातचा प्रकल्प नाही, तो महाराष्ट्राचा आहे. या प्रकल्पामुळे गुंतवणूक महाराष्ट्रात, रोजगार महाराष्ट्रात आणि निर्माण होणारी वीज सुद्धा महाराष्ट्रातच! - यातून 12,000 मेगावॉट वीज महाराष्ट्राला मिळेल. 30,000 कोटींची गुंतवणूक यातून येणार आहे. - हा कोळशावर आधारित प्रकल्प नाही तर सौर ऊर्जा आधारित, त्यामुळे पर्यावरणाला नुकसान करणारा नाही तर पर्यावरणाला पूरक - पंप स्टोरेज प्रकल्प असल्याने याचे स्थान निश्चित असते. तो अन्यत्र करता येत नाही. - या प्रकल्पाला 233 हेक्टर जमीन लागणार असल्याने पर्यायी वृक्षारोपणसाठी कंपनीने वन विभागाला आधीच 253 हेक्टर जमीन सुपूर्द केली आहे. त्यानंतरच वन विभागाने परवानगी दिली. - शिवाय परवानगीसाठी 18 महिन्यांची संपूर्ण वैधानिक प्रक्रिया पूर्ण केली आहे. सर्व संबंधित प्राधिकरणाच्या परवानगी संपूर्ण पर्यावरणीय अभ्यासानंतर प्राप्त झाल्या आहेत. - हा प्रकल्प सैदोनगर रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यात भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यापासून सुमारे 16 किमी दूर आहे. सर्व प्रकल्प घटक अभयारण्याच्या सीमेबाहेर आणि इको-सेन्सिटिव्ह झोन (ESZ) बाहेर आहेत. त्यामुळे अभयारण्यात कोणतीही झाडे तोडणे किंवा काम चालू नाही. - हा प्रकल्प भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिरापासून सुमारे 20 किमी दूर आहे. मंदिराजवळ कोणतेही प्रकल्प काम प्रस्तावित नाही. - या प्रकल्पामुळे पीक तासांमध्ये स्वच्छ वीज मिळेल. इतकी वीज तयार करण्यासाठी वर्षाला सुमारे 4.6 दशलक्ष टन कोळशाचे ज्वलन टाळले जाणार आहे. - वर्षाला 40 लाख वाहनांमुळे जितके कार्बन उत्सर्जन होते, तितके या प्रकल्पाने टळणार आहे. - याच प्रकल्प क्षेत्रात टॉरेंट कंपनी 60,000 झाडे लावणार असून वन विभाग 30,000 झाडे लावणार आहेत. - पाणी आणि जमीन वाचवली: वर्षाला सुमारे 19.7 अब्ज लिटर कूलिंग वॉटर, जे 4 लाख लोकांसाठी पुरेसे आहे ते यात वाचवण्यात आले. इतक्या क्षमतेच्या प्रकल्पात वर्षाला सुमारे 1.6 दशलक्ष टन फ्लाय अॅश आणि 40-50 हेक्टर नवीन ओपन-कास्ट मायनिंग होते. ते या पंप स्टोरेज प्रकल्पामुळे टाळले गेले आहे. @BJP4Maharashtra
— Adv. Ujjwal Nikam (@miujjwalnikam) October 26, 2026
निकम यांच्या म्हणण्यानुसार, हा गुजरातचा नव्हे तर महाराष्ट्राचा प्रकल्प आहे. यातून राज्यात ३०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून रोजगारनिर्मिती आणि वीजनिर्मितीचाही लाभ महाराष्ट्राला मिळेल. प्रकल्पातून १२,००० मेगावॉट वीज उपलब्ध होईल, असा त्यांचा दावा आहे. हा कोळशावर आधारित नसून सौर ऊर्जेवर चालणारा पंप-स्टोरेज प्रकल्प असल्याने तो पर्यावरणासाठी हानिकारक नसल्याचेही त्यांनी म्हटले.
पंप-स्टोरेज प्रकल्पाचे स्थान तांत्रिक कारणांमुळे निश्चित असते आणि तो दुसरीकडे उभारता येत नाही, असे निकम यांनी स्पष्ट केले. प्रकल्पासाठी २३३ हेक्टर जमीन लागणार असून, पर्यायी वृक्षारोपणासाठी कंपनीने २५३ हेक्टर जमीन आधीच वन विभागाकडे सुपूर्द केली. त्यानंतरच विभागाने परवानगी दिली, असा त्यांचा दावा आहे. परवानगी मिळवण्यासाठी १८ महिन्यांची वैधानिक प्रक्रिया आणि पर्यावरणीय अभ्यास पूर्ण केल्याचेही त्यांनी नमूद केले.
प्रकल्पाचे ठिकाण रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सैदोनगर येथे असून, ते भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यापासून सुमारे १६ किलोमीटर अंतरावर आहे. निकम यांच्या माहितीनुसार, प्रकल्पाचे सर्व घटक अभयारण्याच्या सीमा आणि पर्यावरण संवेदनशील क्षेत्राबाहेर आहेत. अभयारण्यात वृक्षतोड किंवा काम सुरू नसल्याचे त्यांनी सांगितले. भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिरापासून हे ठिकाण सुमारे २० किलोमीटर दूर असून मंदिराजवळ कोणतेही काम प्रस्तावित नसल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.
या प्रकल्पामुळे मागणीच्या अधिक काळात स्वच्छ वीज मिळू शकेल. समान प्रमाणातील वीजनिर्मितीसाठी दरवर्षी लागणाऱ्या सुमारे ४६ लाख टन कोळशाचे ज्वलन टाळता येईल, असा निकम यांचा दावा आहे. त्यांच्या मते, वर्षाला ४० लाख वाहनांमधून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाइतके उत्सर्जनही या प्रकल्पामुळे टळेल.
प्रकल्प परिसरात टोरेंट कंपनी ६० हजार, तर वन विभाग ३० हजार झाडे लावणार असल्याची माहिती निकम यांनी दिली. तसेच दरवर्षी सुमारे १९.७ अब्ज लिटर कूलिंग वॉटरची बचत होईल. हे पाणी चार लाख लोकांसाठी पुरेसे ठरू शकते, असा त्यांचा दावा आहे. एवढ्या क्षमतेच्या कोळसा प्रकल्पातून निर्माण होणारी वर्षाला सुमारे १६ लाख टन फ्लाय अॅश आणि ४० ते ५० हेक्टर नव्या खुल्या खाणकामाची गरजही टळेल, असे त्यांनी म्हटले.
कर्जत तालुक्यातील साईडोंगर-१ परिसरात प्रस्तावित टोरेंट पॉवरचा पंप-स्टोरेज जलविद्युत प्रकल्प सुमारे ३,००० मेगावॅट क्षमतेचा असून त्याचा अंदाजित खर्च १३,५०० कोटी रुपये आहे. वीजनिर्मितीबरोबरच अतिरिक्त ऊर्जा साठवणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. अभयारण्यापासूनच्या अंतरासह प्रकल्पाविषयीची माहिती कंपनीच्या दाव्यांवर आधारित आहे.