१३,५०० कोटींच्या प्रकल्पासाठी तीन लाखांहून अधिक झाडे तोडली जाणार असल्याची भीती; पर्यावरणप्रेमींना सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन
रायगड : कर्जत-भीमाशंकर परिसरातील प्रस्तावित जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पावरून महाराष्ट्रातील राजकीय आणि पर्यावरणीय संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत. या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुढाकार घेतला असून, साई डोंगर परिसराची पाहणी केल्यानंतर त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. बुधवारी केलेल्या या दौऱ्यानंतर संध्याकाळी होणाऱ्या सभेत राज ठाकरे सरकारच्या भूमिकेवर काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
साई डोंगराची पाहणी; स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्या
काही दिवसांपूर्वी कर्जत परिसरातील ग्रामस्थांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन प्रस्तावित प्रकल्पामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले होते. तसेच या भागात प्रत्यक्ष येऊन परिस्थितीची पाहणी करण्याची विनंती केली होती. ग्रामस्थांच्या मागणीला प्रतिसाद देत राज ठाकरे यांनी सह्याद्री पर्वतरांगांचा भाग असलेल्या साई डोंगर परिसराचा दौरा केला.
दौऱ्याच्या सकाळच्या सत्रात त्यांनी स्थानिक रहिवाशांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी आणि प्रकल्पाबाबतच्या चिंता समजून घेतल्या. यावेळी त्यांनी पर्यावरणप्रेमींना संध्याकाळच्या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले. हा प्रकल्प सरकार कशा प्रकारे पुढे रेटते, हे पाहू, असा आक्रमक पवित्राही त्यांनी व्यक्त केला.
झाडांच्या कत्तलीमुळे पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी
कर्जत-भीमाशंकर परिसरातील वृक्षतोडीचे काही फोटो आणि व्हिडिओ अलीकडेच सोशल मीडियावर प्रसारित झाले होते. या दृश्यांमुळे स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. एका खासगी कंपनीच्या प्रकल्पासाठी शेकडो वर्षे जुनी झाडे तोडली जात असल्याचा आरोप करत केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले.
राज्यात दुष्काळाचे संकट असताना मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करणारे प्रकल्प राबवणे पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य नसल्याचे मतही पर्यावरणप्रेमींकडून मांडले जात आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण करण्याची मागणी करत या प्रकल्पाला विरोध वाढताना दिसत आहे.
नेमका काय आहे कर्जतचा जलविद्युत प्रकल्प?
गुजरातमधील टॉरेंट पॉवर कंपनीकडून साई डोंगर परिसरात जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे १३ हजार ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून, त्याची क्षमता ३ हजार मेगावॅट इतकी असल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकल्पाच्या उभारणीसाठी तीन लाखांहून अधिक झाडे तोडली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे परिसरातील जैवविविधतेवर विपरीत परिणाम होण्याबरोबरच पक्षी आणि वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात येऊ शकतो, अशी चिंता पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.
याशिवाय डोंगर उतारावरील मातीचे संरक्षण, नैसर्गिक जलप्रवाह, पारंपरिक शेती आणि पर्यटन व्यवसायावरही या प्रकल्पाचे परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विकासाच्या नावाखाली कर्जत-भीमाशंकर परिसरातील नैसर्गिक संसाधनांचे नुकसान का केले जात आहे, असा सवाल प्रकल्पविरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.
राज ठाकरे, अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची भूमिका महत्त्वाची
या प्रकल्पाच्या विरोधात राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे या मुद्द्याला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. मनसेचे युवा नेते आणि पर्यावरणप्रेमी अमित ठाकरे हेही राज ठाकरे यांच्यासोबत या दौऱ्यात सहभागी आहेत.
दुसरीकडे, आमदार आदित्य ठाकरे यांनी सोमवारी या परिसराचा दौरा केला होता. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यास संबंधितांना आमच्याशी सामना करावा लागेल, असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला होता. अशा प्रकारे ठाकरे बंधूंनी या प्रकल्पाच्या विरोधात भूमिका मांडली आहे.
महायुतीतील काही स्थानिक आमदारांनीही प्रकल्पाला विरोध दर्शवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे साई डोंगर परिसरातील प्रस्तावित प्रकल्पावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
आता राज ठाकरे यांच्या सभेतून सरकारवर कोणते आरोप केले जातात, प्रकल्पाच्या विरोधात पुढील आंदोलनाची दिशा काय असेल आणि सरकार यावर कोणती भूमिका घेते, याकडे स्थानिक नागरिकांसह पर्यावरणप्रेमींचे लक्ष लागले आहे.