‘पिवळा धोबी’ प्रजातीच्या पक्ष्यांच्या मृत्यूचे गूढ कायम; वनविभागाकडून तपास सुरू, नमुने मुंबई आणि भोपाळला पाठवणार
सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये कोयना नदीपात्रात ३५ हून अधिक पक्ष्यांचा अचानक मृत्यू झाल्याने वन्यजीवप्रेमी आणि वनविभागाची चिंता वाढली आहे. नदीकाठावर मृतावस्थेत आढळलेल्या कासवाजवळ पक्ष्यांचा थवा जमला होता. त्यानंतर काही मिनिटांतच हे पक्षी जमिनीवर कोसळल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमागे नेमके काय कारण आहे, याचा शोध घेण्यासाठी वनविभागाने तपास सुरू केला असून मृत पक्ष्यांचे नमुने वैज्ञानिक तपासणीसाठी मुंबई आणि भोपाळ येथे पाठवण्याची तयारी केली जात आहे.

मृत कासवाजवळ जमले पक्षी; काही वेळातच मृत्यू
कराड येथील कोयना नदीच्या परिसरात ‘पिवळा धोबी’ (Yellow Wagtail) या प्रजातीचे पक्षी आढळले होते. त्याच परिसरात एक कासव मृतावस्थेत पडले होते. या कासवाच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात अळ्या झाल्याचेही निदर्शनास आले. या मृत कासवाजवळ पक्षी जमा झाले होते. मात्र, काही वेळातच त्यातील अनेक पक्षी अचानक खाली कोसळू लागले.

या घटनेत ३५ हून अधिक पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पक्ष्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पाण्यातील संभाव्य दूषित घटक, नैसर्गिक बदल किंवा अन्य कारणांमुळे ही घटना घडली का, याचा तपास केला जात आहे.

मृत पक्ष्यांची वैज्ञानिक तपासणी होणार
घटनेची माहिती मिळताच कराडच्या वनविभागाने तातडीने दखल घेतली. मृत पक्षी गोळा करून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ते ताब्यात घेतले आहेत. पक्ष्यांच्या मृत्यूमागील कारण निश्चित करण्यासाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या (BHNS) शास्त्रज्ञांनाही माहिती देण्यात आली.
या संस्थेचे अधिकारी कराडमध्ये दाखल होऊन घटनास्थळाची पाहणी करत आहेत. मृत पक्ष्यांचे नमुने मुंबई आणि भोपाळ येथे तपासणीसाठी पाठवण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. या तपासणीतून पक्ष्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.

विषाणूजन्य आजाराची शक्यता तपासणे महत्त्वाचे
मानद वन्यजीव अभ्यासक रोहन भाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी पाहणी केली असता एकाच ठिकाणी सुमारे ३० ते ३५ पक्षी मृतावस्थेत आढळले. याशिवाय, २० ते २५ पक्षी नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याचे त्यांनी सांगितले. मृत पक्षी गोळा केल्यानंतर कराडच्या वनविभागाला याची माहिती देण्यात आली आणि अधिकाऱ्यांनी पक्षी ताब्यात घेतले.

या घटनेचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास होणे आवश्यक असल्याचे रोहन भाटे यांनी स्पष्ट केले. पक्ष्यांच्या मृत्यूमागे एखादा विषाणू कारणीभूत असल्यास त्याचा संसर्ग इतर पक्ष्यांमध्ये पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा घटनांकडे गांभीर्याने पाहून वेळेत तपास करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून काही मृत पक्षी तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. प्रयोगशाळेतील तपासणी पूर्ण झाल्यानंतर अहवाल सादर केला जाईल. त्यानंतरच पक्ष्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.