मिरवणूक मार्गावरील अतिक्रमणे, अडथळ्यांवर चर्चा; शांततेत उत्सव साजरा करण्याचे पोलिस प्रशासनाचे आवाहन
कळमनुरी (Kalamnuri Shantata Committee) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथील तहसील कार्यालयात ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी शांतता समितीची बैठक घेण्यात आली. तहसीलदार जीवककुमार कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस पोलीस उपअधीक्षक नारायण देशमुख, पोलीस उपअधीक्षक मयूर रसाळ, गटविकास अधिकारी अमितकुमार मुंडे, अभियंता जयस्वाल, कार्यालयीन अधीक्षक नदीम रजवी यांच्यासह शहर व ग्रामीण भागातील गणेश मंडळांचे पदाधिकारी, पत्रकार व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
बैठकीत शहरासह ग्रामीण भागातील गणेश मंडळांच्या विविध समस्या व अडचणी मांडण्यात आल्या. गणेशोत्सव काळात मंडळांना येणाऱ्या अडचणींवर उपस्थित अधिकाऱ्यांनी चर्चा करून त्या सोडविण्यासंदर्भात सकारात्मक विचारमंथन केले.
मिरवणूक मार्गावरील अडथळे चर्चेच्या केंद्रस्थानी कळमनुरी शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर असलेले अतिक्रमण, वाहतुकीतील अडथळे तसेच इतर समस्या याबाबत बैठकीत विशेष चर्चा झाली. पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनाच्या समन्वयातून मिरवणूक मार्गावरील अडथळे दूर करण्यात येतील, असे सांगण्यात आले. दरम्यान, नगरपालिकेचे मुख्याधिकारी हे बैठकीस उपस्थित नसल्याने विनोद बांगर यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच शहरातील मिरवणूक मार्गावरील अडथळे व अतिक्रमणांचे फोटो सादर करून प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. याबाबतही प्रशासनाकडून सकारात्मक भूमिका घेण्यात आली.
शांततेत व संस्कृती जपत गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन
पोलीस उपअधीक्षक नारायण देशमुख व मयूर रसाळ यांनी सर्व गणेश मंडळांनी शांतता व सलोखा राखत गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. डीजेबाबत गणेश मंडळांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करून आपल्या स्तरावर योग्य निर्णय घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. गणेशोत्सव हा आनंदाचा व सामाजिक एकोप्याचा सण असून, मंडळांनी संस्कृती जपत उत्सवाला विधायक स्वरूप देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. बैठक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी गजानन होळकर, लक्ष्मीकांत माखणे, नामदेव कोटकर, विलास बांगर यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.