दिंडोरी तालुक्यातील जोपुळ येथील यशवंतराव पाटील एज्युकेशन सोसायटीच्या आश्रमशाळेत १६ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
जोपुळ येथील यशवंतराव पाटील एज्युकेशन सोसायटीच्या आश्रमशाळेतील घटना; पालकांकडून सखोल चौकशीची मागणी, वणी पोलिसांचा तपास सुरू
नाशिक : दिंडोरी तालुक्यातील जोपुळ येथील यशवंतराव पाटील एज्युकेशन सोसायटीच्या आश्रमशाळेत १६ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हरिदास अंबादास शेखरे असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो इयत्ता दहावीत शिक्षण घेत होता. विद्यार्थिनीला चिठ्ठी दिल्याच्या कारणावरून त्याला मुख्याध्यापकांच्या कार्यालयात बोलावण्यात आले होते. त्यानंतर तो मानसिक तणावात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
हरिदास शेखरे हा जोपुळ येथील संबंधित आश्रमशाळेत दहावीच्या वर्गात शिकत होता. विद्यार्थिनीला चिठ्ठी दिल्याच्या प्रकरणावरून त्याला मुख्याध्यापकांच्या कार्यालयात बोलावण्यात आले होते. या घटनेनंतर त्याच्यावर मानसिक तणाव निर्माण झाला असल्याचे प्राथमिक तपासातून सांगितले जात आहे. त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर हरिदासचे कुटुंबीय तसेच पालक आश्रमशाळेत दाखल झाले. विद्यार्थ्याच्या मृत्यूची सखोल चौकशी करून घटनेमागील सत्य समोर आणावे, अशी मागणी पालकांनी केली. तसेच या प्रकरणाला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. पोलिसांकडून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर पालकांची समजूत काढण्यात आली.
दरम्यान, हरिदासचा मृतदेह पिंपळगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. तेथे शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
या घटनेमुळे जोपुळ परिसरासह आश्रमशाळेतही खळबळ उडाली आहे. हरिदासच्या मृत्यूमागील नेमकी पार्श्वभूमी काय होती, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणाची वणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.