महानगरपालिका आणि जीएसटी विभागात ठेका पद्धतीवर नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत ८३ हून अधिक शिक्षित बेरोजगारांकडून तब्बल ३८ लाख ३ हजार रुपये उकळल्याचा प्रकार चंद्रपुरात समोर आला आहे.
मनपा व जीएसटी विभागात ठेका तत्त्वावर नोकरी लावून देण्याचे आश्वासन; मुख्य आरोपीसह दोघांना अटक
चंद्रपूर : महानगरपालिका आणि जीएसटी विभागात ठेका पद्धतीवर नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत ८३ हून अधिक शिक्षित बेरोजगारांकडून तब्बल ३८ लाख ३ हजार रुपये उकळल्याचा प्रकार चंद्रपुरात समोर आला आहे. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून मुख्य आरोपी जितेंद्र सारसर आणि त्याचा साथीदार मंगला संभा वानखेडे या दोघांना अटक केली आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र सारसर हा चंद्रपूर महानगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. मात्र, तो स्वतःला मनपातील वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवत होता. तसेच महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपले जवळचे संबंध असल्याचे सांगून बेरोजगारांचा विश्वास संपादन करीत होता.
मनपा आणि जीएसटी विभागात ठेका पद्धतीवर नोकरी लावून देण्यासाठी अवघ्या अडीच लाख रुपयांची मागणी केली जात होती. नोकरी मिळेल, या आशेने अनेक बेरोजगारांनी आरोपीला पैसे दिले. विश्वास बसावा यासाठी जितेंद्र फोनवर नोकरीसंदर्भात बोलत असल्याचे नाटक करीत असल्याचेही तपासात समोर आले आहे.
अनेक महिने नियुक्तीपत्र न मिळाल्याने संशय
पैसे देऊनही अनेक महिने उलटून गेले तरी नियुक्तीपत्र मिळत नसल्याने काही बेरोजगारांना संशय आला. त्यानंतर त्यांनी थेट महानगरपालिका कार्यालयात जाऊन चौकशी केली. यावेळी जितेंद्र सारसर हा अधिकारी नसून सफाई कर्मचारी असल्याचे समोर आले आणि फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.
पोलिसांच्या तपासानुसार, मंगला संभा वानखेडे हीदेखील जितेंद्रला या फसवणुकीत मदत करीत होती. त्यामुळे पोलिसांनी तिच्याविरुद्धही कारवाई केली आहे.
पैसे परत मागितल्यावर जीवे मारण्याची धमकी
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदार सोनी ठाकरे यांच्यासह इतर पीडितांनी आरोपींकडे आपले पैसे परत मागितले. यावेळी जितेंद्र सारसरने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
यानंतर पीडित मंगला वानखेडेच्या घरी गेले असता तिच्या पतीनेही शिवीगाळ करत धमकावल्याचे तक्रारीत नमूद आहे.
रामनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(४), ३१९(२), ३५१(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणात आणखी किती जणांचा सहभाग आहे, तसेच या फसवणुकीत एकूण किती रक्कम उकळण्यात आली आहे, याचा पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.