तंटामुक्तीच्या निवडणुकीचा विषयच नसलेले जिल्ह्यातील एकमेव गाव;
स्वच्छता, व्यसनमुक्ती अन् एकोप्यामुळे राज्यभर चर्चा
संजय देशमुख
बुलढाणा (Jamthi Model Village) : तालुक्यातील जामठी हे गाव सध्या संपूर्ण जिल्ह्यात कौतुकाचा विषय ठरले आहे. स्वच्छता, समृद्धी आणि व्यसनमुक्तीकडे यशस्वी वाटचाल करणार्या या गावाने शांतता आणि एकोपा कायम राखत एक नवा आदर्श निर्माण केला आहे. विशेष म्हणजे, तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व. आर. आर. पाटील यांनी २००७ मध्ये सुरू केलेल्या ‘महात्मा गांधी तंटामुक्ती अभियाना’ची उत्तम अंमलबजावणी करत या गावात मागील तब्बल वीस वर्षांपासून साहेबराव पाटील हेच एकछत्री अंमलात तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून कायम आहेत.
साडेतीन ते चार हजार लोकसंख्या असलेल्या, ९ सदस्यांच्या ग्रामपंचायत असलेल्या या (Jamthi Model Village) गावात दरवर्षी १५ ऑगस्ट किंवा २ ऑक्टोबरच्या ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्षांच्या निवडीवरून अनेक गावांत वाद, अगदी हाणामार्यांपर्यंतचे प्रकार घडतात. मात्र, धाड पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या जामठी गावात सन २००७ पासून आजतागायत साहेबराव पाटील यांच्याशिवाय दुसर्या कोणाचीही निवड करण्याचा प्रसंगच ओढवला नाही. जामठी हे जिल्ह्यातील असे एकमेव गाव असावे, जिथे तंटामुक्ती अध्यक्षांच्या निवडीचा विषय कधीच विवादित ठरला नाही. तंटामुक्ती अध्यक्ष साहेबराव पाटील हे हिंदू, मुस्लिम, बौद्ध, तडवी भिल्लसह सर्व समाजाच्या नागरिकांना सोबत घेऊन प्रत्येक अडीअडचणीला धावून जातात.
गावातील छोटे-मोठे वाद आपसातच मिटवल्यामुळे गेल्या २० वर्षांत (Jamthi Model Village) गावात केवळ एकच प्रकरण अपवाद वगळता एकही भांडण धाड पोलीस स्टेशनपर्यंत गेले नाही. विशेष म्हणजे, अमरावती विभागीय पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष रामकृष्णा गुलाबराव पाटील हे याच गावचे असून, ग्रामपंचायत सरपंच, पोलीस पाटील आणि तंटामुक्ती अध्यक्ष हे सर्वजण गावकर्यांना सोबत घेऊन विकासासाठी नेहमी कटिबद्ध असतात. गावात कोणग्व्ही सरपंच असला तरी गट-तटाचे राजकारण बाजूला सारून सर्व गावकरी एकजुटीने काम करतात. याच सहकार्यातून गावात दारूबंदी आणि गुटखाबंदी यशस्वीरीत्या राबवण्यात आली आहे.
उच्चपदस्थ आणि सामाजिक व्यक्तींचे योगदान
जामठी गावचे (Jamthi Model Village) तंटामुक्ती अध्यक्ष साहेबराव पाटील हे महाराष्ट्र शासनाचे जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथराव डवले (IAS) यांचे सासरे आहेत. तसेच, सर्वपरिचित सामाजिक कार्यकर्ते अरुण साहेबराव पाटील हे त्यांचे सुपुत्र आहेत. गावाची हीच अनोखी वाटचाल आणि एकोपा इतर गावांना नेहमीच प्रेरणा देणारा ठरत आहे.