Indian Jain Association: भारतीय जैन संघटनेने कुटुंब व्यवस्था अधिक भक्कम करण्यासाठी आणि समाजाला सकारात्मक दिशा देण्यासाठी 10 कलमी कार्यक्रमाची घोषणा केली आहे.
हिंगोली (Indian Jain Association) : भारतीय जैन संघटनेने कुटुंब व्यवस्था अधिक भक्कम करण्यासाठी आणि समाजाला सकारात्मक दिशा देण्यासाठी 10 कलमी कार्यक्रमाची घोषणा केली आहे. हिंगोलीतील श्री शांतीनाथ श्वेतांबर जैन मंदिर उपाश्रय आणि महावीर भवन येथे आयोजित संवाद यात्रेत हा उपक्रम सादर करण्यात आला.
संघटनेच्या वतीने सांगण्यात आले की बदलत्या काळानुसार कुटुंबातील संवाद मजबूत करणे ही काळाची गरज आहे. यासाठी सामाजिक संवादावर भर देण्यात येणार आहे जेणेकरून समाजाला योग्य मार्गदर्शन मिळेल. विवाहासंदर्भातही नवी पावले उचलण्यात आली आहेत. विवाह योग्य मुला-मुलींच्या पालकांसाठी विशेष मार्गदर्शन सत्र घेतले जाणार असून त्यात सध्याच्या पिढीच्या अपेक्षा आणि विचार समजून घेण्यावर भर असेल. विवाहापूर्वी आणि विवाहानंतरही समुपदेशनाची व्यवस्था करण्यात आली आहे जेणेकरून जोडप्यांना सुखद वैवाहिक जीवनासाठी मदत मिळू शकेल.
संघटने विवाहासाठी बायोडाटा बँक तयार केली असून उच्च शिक्षित मुला-मुलींसाठी स्वतंत्र विवाह अॅप्लिकेशनही सुरू करण्यात आले आहे. याशिवाय परिणय पथ या उपक्रमांतर्गत हिंगोलीसह जवळच्या चार जिल्ह्यातील पात्र मुला-मुलींच्या भेटी घडवून आणल्या जाणार आहेत. दुसऱ्यांदा संसार थाटू इच्छिणाऱ्यांसाठी हमसफर दोबारा हा पुनर्विवाह कार्यक्रमही राबवला जात आहे. या सर्व उपक्रमांचे प्रशिक्षण ऑनलाईन आणि प्रत्यक्ष स्वरूपात प्रशिक्षित शिक्षकांद्वारे दिले जाणार आहे.
कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी जैन कौटुंबिक अदालतही गेल्या पाच महिन्यांपासून कार्यरत आहे. आतापर्यंत 118 प्रकरणे या अदालतकडे आली असून त्यापैकी 42 प्रकरणांमध्ये मध्यस्थीच्या माध्यमातून तोडगा निघाला आहे. यासाठी समाजातील सेवानिवृत्त न्यायाधीशही सहकार्य करत आहेत. अशा प्रकरणांची नोंदणी पुणे येथील मुख्य कार्यालयात केली जात आहे.
या (Indian Jain Association) संवाद यात्रेत हिंगोली जिल्हा महिला अध्यक्षपदी डॉ. सौ. रूपालीताई नितीनजी साकळे आणि सचिवपदी सौ. तारिकाबेन गिरीशभाई लोडाया यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कार्यक्रमाला राज्याध्यक्ष केतनभाई शाह, राज्य सचिव प्रवीण पारख आणि फाउंडेशन कार्यक्रम प्रमुख झूमरलाल मुथा यांनी मार्गदर्शन केले.
सभेला प्रकाशचंद बडेरा, सुधाकर साकळे, सुरेशचंद सोनी, दिपक सावजी, प्रकाशचंद बरडिया, रमेशचंद सोनी, महावीर मुथा, ऋषभ छाजेड, प्रदीप सोनी, अरुण साकळे, प्रवीण सोनी, संजय साकळे, तिलोकचंद सोनी, विजयजी साकळे, नरेंद्र सोनी, मनोज डहाले, दिलीप मांडवगडे, हेमंत साकळे, मयूर सोनी, सौ. मंदाताई साकळे, सौ. आरती शाह, सौ. शिल्पा मेहता, सौ. सरोजना बरडिया, सौ. स्नेहल सोनी, संगीता सोनी यांच्यासह राज्य कार्यकारिणी सदस्य प्रकाशचंद सोनी, रत्नाकर महाजन आणि मोठ्या संख्येने जैन समाज बांधव-भगिनी उपस्थित होते.