शेनोडी- रामवाडी उपसा सिंचन योजनेच्या प्रशासकीय मान्यतेसाठी लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे
कळमनुरी (Isapur Dam Andolan) : शेनोडी -रामवाडी उपसा सिंचन योजनेच्या शासन स्तरावरील प्रस्तावाला तातडीने प्रशासकीय मान्यता मिळावी, या प्रमुख मागणीसाठी पाणी हक्क संघर्ष समितीच्या वतीने ईसापूर धरणाच्या उजव्या कालव्यात तब्बल तीन तास ठिय्या मांडून जोरदार आंदोलन करण्यात आले . उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांनी शासन स्तरावरून पाणी उपलब्धते बाबत मंजुरी घेऊन तातडीने कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले. मात्र, ५ नोव्हेंबरपर्यंत सकारात्मक निर्णय न झाल्यास ५ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा संघर्ष समितीने दिला आहे.
ईसापूर जलाशयातून (Isapur Dam Andolan) शेनोडी-रामवाडी उपसा जलसिंचन योजने अंतर्गत १९५८ हेक्टर क्षेत्राचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. मात्र, शासनाकडे प्रशासकीय मान्यता देण्याची प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे शेतकर्यांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला होता. ठरल्याप्रमाणे १ नोव्हेंबर रोजी ईसापूर धरणाच्या उजव्या कालव्यात पाणी सोडण्यात येणार होता, याच दिवशी पाणी आडवण्याचे धडक आंदोलन पुकारण्यात आले. मसोड, शिवनी, रामवाडी, मुंढळ आणि असोलवाडी या पाच गावांतील शेकडो शेतकरी, शेतमजूर व युवक जिल्हा परिषद प्रशाळेच्या मैदानावर एकत्र आले. तेथून शिस्तबद्ध मोटारसायकल व वाहनांची रॅली काढत तरोडा शिवारातील ईसापूर धरणाच्या उजव्या कालव्यात जाऊन ठिय्या दिला.
कालव्यात तब्बल तीन तास ठिय्या मांडल्यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. आंदोलनाची तीव्र व आक्रमकता पाहून उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता प्रसाद लांब यांनी तातडीने आंदोलन स्थळी धाव घेतली आणि आंदोलकांशी चर्चा केली. पाण्याचा प्रश्न व उपलब्धतेची खात्री देत, वरिष्ठांशी संपर्क साधून शासनाकडून तातडीने मंजुरी व प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही पूर्ण करण्याचे आश्वासन कार्यकारी अभियंता यांनी लेखी स्वरूपात दिले. त्यानंतर आंदोलकांनी आंदोलन स्थगित केले.
या (Isapur Dam Andolan) आंदोलनात मसोड, शिवनी, रामवाडी, मुंढळ आणि असोलवाडी येथील शेकडो शेतकरी आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी उपविभागीय अभियंता ज्ञा. सो. शूर व संबंधित कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते. आंदोलना दरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून कळमनुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मयूर रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ शेवाळे व पोलीस कर्मचारी तसेच गजानन होळकर यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.