व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; पोलिसांचा जागोजागी कडेकोट बंदोबस्त
सेनगाव (Manoj Jarange Patil) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या आवाहनानुसार गुरुवारी (ता. ३) सेनगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदला शहरातील व्यापारी, दुकानदार व व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपापली दुकाने बंद ठेवून सहभाग नोंदविला.
बंदच्या पार्श्वभूमीवर सेनगाव शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठ तसेच संवेदनशील ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त जागोजागी तैनात करण्यात आला होता. पोलिस प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज होती.
दरम्यान, बंदच्या आवाहनाला व्यापाऱ्यांनीही ठाम पाठिंबा दर्शविला. सकाळपासूनच शहरातील बहुतांश दुकाने आणि व्यावसायिक आस्थापना बंद असल्याने मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत होता. नेहमी गजबजलेल्या रस्त्यांवरही वर्दळ कमी दिसून आली.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी हा बंद शांततेच्या मार्गाने पाळण्यात आला. व्यापाऱ्यांनी स्वेच्छेने दुकाने बंद ठेवत आंदोलनाला आपला पाठिंबा नोंदविला, तर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखला