कुरूंदा (Illegal minor minerals transportation) : येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या गौण खनिज मुरूम वाहतूक करणार्या दोन ट्रॅक्टरवर कुरुंदा पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, विनापरवाना व महसूल विभागाची कोणतीही परवानगी नसताना दोन ट्रॅक्टरमधून अवैधरित्या दगडाची वाहतूक सुरू होती. माहिती मिळताच कुरुंदा पोलिसांनी सापळा रचून दोन्ही ट्रॅक्टर ताब्यात घेतले.
जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये एक सोनालिका डीआय -७५० ट्रॅक्टर आणि एक स्वराज ७४४ एक्स टी ट्रॅक्टरचा समावेश असून, दोन्ही ट्रॉली मुरमाने भरलेल्या होत्या. सदर ट्रॅक्टर कुरुंदा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले असून, पुढील कारवाईसाठी महसूल विभागाला पत्र देण्यात आले आहे. कुरुंदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक उमेश कारामुंगे, गिरगाव बीट जमादार संदीप टाक, गजानन भालेराव, बालाजी साठे, प्रकाश भुरके आदींनी केली.