Illegal Nazul land: शहरातील जुनी वस्ती येथील नझूल शिट क्रमांक २, प्लॉट क्रमांक ९३, क्षेत्रफळ ७५.०० चौ.मी. (८०७ चौ.फूट) या मालमत्तेच्या मूळ मालक केसरसा सखबनसा ढोले यांचा सुमारे ३० वर्षांपूर्वी मृत्यू..
मानोरा (Illegal Nazul land) : शहरातील जुनी वस्ती येथील नझूल शिट क्रमांक २, प्लॉट क्रमांक ९३, क्षेत्रफळ ७५.०० चौ.मी. (८०७ चौ.फूट) या मालमत्तेच्या मूळ मालक केसरसा सखबनसा ढोले यांचा सुमारे ३० वर्षांपूर्वी मृत्यू झाला असून त्यांना कोणताही कायदेशीर वारस नाही. त्यांनी लग्न केलेले नसल्याने त्यांना भाऊ, बहीणही नाही. असे असताना या मालमत्तेवर तुषार नारायण अनवाने या व्यक्तीने गैरकायदेशीर ताबा केला असल्याची तक्रार अभिजितसिंह रामसुमनसिंह दीक्षीत यांनी तहसीलदार मानोरा यांच्याकडे केली आहे.
तक्रार अर्जात म्हटले आहे की, मूळ मालक केसरसा ढोले यांच्या नावे असलेल्या मिळकतीवर सध्या कायदेशीर वारस म्हणून हक्क सांगणारी कोणतीही व्यक्ती अस्तित्वात नाही. सदर व्यक्तीकडे कोणताही मालकी हक्काचा कायदेशीर दस्तावेज नाही. सदर मालमत्तेबाबत अद्याप महसूल अभिलेखामध्ये योग्य ती कायदेशीर कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे भविष्यात सदर मालमत्ता बेकायदेशीररित्या हस्तांतरित / विक्री करण्याचा किंवा खोट्या वारसाच्या आधारे फेरफार नोंद करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे.
तक्रारदाराने मागणी केली आहे की, (Illegal Nazul land) कोणताही कायदेशीर वारस नसल्यास मालमत्तेबाबत लागू कायद्यानुसार वारस नसल्यामुळे शासनाकडे निहित होणे बाबत योग्य ती चौकशी व कार्यवाही करणे आवश्यक आहे. सक्षम महसूल अधिकाऱ्यामार्फत सखोल चौकशी करून मृत मालकाचे कायदेशीर वारस आहेत किंवा नाहीत, याची खातरजमा करावी. सर्व संभाव्य कायदेशीर वारस शोधावेत आणि जर कोणताही कायदेशीर वारस उपलब्ध नसल्याचे निष्पन्न झाल्यास, सदर मालमत्ता शासनाकडे निहित करून ताब्यात घेण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी.
चौकशी पूर्ण होईपर्यंत सदर मालमत्तेबाबत कोणतीही अनधिकृत फेरफार नोंद, हस्तांतरण किंवा इतर महसूल कार्यवाही होऊ नये यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, अशी विनंतीही अर्जात करण्यात आली आहे. या तक्रार अर्जाची प्रत जिल्हाधिकारी वाशिम आणि उपविभागीय अधिकारी कारंजा यांनाही माहिती व उचित कार्यवाहीस्तव सादर करण्यात आली आहे.