Police Patil suspended: गावात सुरू असलेल्या अवैध धंद्यांची माहिती जाणीवपूर्वक लपवून पोलीस प्रशासनाला सहकार्य न करणे आणि कर्तव्यात कसूर करणे तीन पोलीस पाटलांना चांगलेच महागात
अवैध धंद्यांना पाठीशी घालणे पडले महागात
आखाडा बाळापूर (Police Patil suspended) : गावात सुरू असलेल्या अवैध धंद्यांची माहिती जाणीवपूर्वक लपवून पोलीस प्रशासनाला सहकार्य न करणे आणि कर्तव्यात कसूर करणे तीन पोलीस पाटलांना चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणी कळमनुरी उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाने कठोर पाऊल उचलत उपविभागातील तीन पोलीस पाटलांना थेट तीन महिन्यांसाठी निलंबित केले आहे. उपविभागीय दंडाधिकारी प्रतिक्षा भुते यांनी ३१ ऑगस्ट रोजी या निलंबनाचे आदेश जारी केले आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग हिंगोली शहर यांनी या संदर्भात अहवाल सादर केला होता. त्या अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.
महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम १९६७ नुसार पोलीस पाटील हे गावपातळीवर पोलीस प्रशासनाचा कणा मानले जातात. गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गावात सुरू असलेल्या कोणत्याही प्रकारच्या अवैध आणि बेकायदेशीर कृत्यांची माहिती तात्काळ पोलीस प्रशासनाला देणे ही त्यांची प्राथमिक जबाबदारी आहे. मात्र संबंधित पोलीस पाटलांनी आपल्या गावात सुरू असलेल्या अवैध धंद्यांबाबत प्रशासनाला वेळीच माहिती देणे आवश्यक असताना जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे आणि निष्काळजीपणा केल्याचे चौकशीत समोर आले.
या गंभीर बाबीची दखल घेत उपविभागीय दंडाधिकारी, कळमनुरी यांनी धानोरा जहागीरचे पोलीस पाटील विश्वनाथ देवबाराव जाधव, कोंढूरचे पोलीस पाटील तथा चिंचोर्डीचा अतिरिक्त पदभार असलेले पांडुरंग दादाराव भुरके आणि वाकोडीचे पोलीस पाटील भागवत दत्तराव करडखेले यांना पोलीस पाटील पदावरून तीन महिन्यांच्या कालावधीसाठी निलंबित केले आहे.
या कारवाईमुळे पोलीस पाटील वर्तुळात एकच खळबळ उडाली असून जे (Police Patil suspended) पोलीस पाटील आपल्या कर्तव्यात हयगय करतील किंवा अवैध धंद्यांना अभय देतील त्यांची गय केली जाणार नाही असा कडक संदेशच प्रशासनाने या कारवाईतून दिला आहे. पोलिस पाटलांवर निलंबनाची कारवाई सुरू झाल्याने अनेकांच्या छातीचे ठोकेही वाढले आहेत.
यापुर्वी बळसोंडच्या पोलिस पाटील महिलेचे निलंबन
हिंगोली : शहराजवळील अकोला बायपास ते गारमाळ रस्त्यालगत अप्पर पोलिस अधिक्षकांच्या पथकाने टाईम बाजार मटका जुगारावर ३१ जुलैला छापा मारला होता. या भागातील महिला पोलिस पाटील श्रीमती रत्नमाला दिनकर शिखरे यांच्या कार्यक्षेत्रात जुगार सुरू असताना त्याची माहिती पोलिसांना न दिल्याने हिंगोली ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकार्यांनी पाठवलेल्या अहवालावरून उपविभागीय अधिकारी समाधान घुटूकडे यांनी रत्नमाला शिखरे यांचे १ महिन्यासाठी निलंबन केले होते.