होम ट्रँगल ॲपद्वारे आलेल्या कर्मचाऱ्यांनीच मारला डल्ला; मालाड पोलिसांची कारवाई, चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत
मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घराची साफसफाई करण्यासाठी ऑनलाइन सेवा घेणे मुंबईतील एका महिलेला चांगलेच महागात पडले. घर स्वच्छ करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनीच संधी साधून तब्बल १२ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि मौल्यवान वस्तू लंपास केल्याचा प्रकार मालाड पश्चिम परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा मालाड पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे छडा लावत तीन आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे, पोलिसांनी चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमालही जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मालाड पश्चिम येथे राहणाऱ्या ५२ वर्षीय महिलेने दिवाळीच्या साफसफाईसाठी २६ ऑक्टोबर २०२६ रोजी होम ट्रँगल ॲपवरून क्लिनिंग सर्व्हिस आरक्षित केली होती. त्यानुसार संबंधित कंपनीचे चार कर्मचारी महिलेच्या घरी पोहोचले. त्यांनी घरातील स्वच्छता पूर्ण केली आणि त्यानंतर तेथून निघून गेले.
मात्र, कर्मचारी गेल्यानंतर काही वेळातच घरातील बेडरूममधील कपाटात ठेवलेल्या मौल्यवान वस्तू गायब झाल्याचे कुटुंबीयांच्या निदर्शनास आले. घरात शोधाशोध केल्यानंतर दागिन्यांची चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. चोरट्यांनी ५० ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस, १० ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याचे बिस्किट आणि ५०० ग्रॅम वजनाची चांदीची वीट चोरून नेली होती. या सर्व वस्तूंची अंदाजे बाजारमूल्य किंमत १२ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
मोबाईल बंद करून पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न
दागिने चोरीला गेल्याचे लक्षात येताच महिलेने मालाड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास हाती घेतला. घराच्या साफसफाईसाठी होम ट्रँगल ॲपमार्फत आलेल्या कर्मचाऱ्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने तपासाची दिशा त्या कर्मचाऱ्यांकडे वळवण्यात आली.
पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे संबंधित व्यक्तींचा शोध सुरू केला. तपासादरम्यान संशयित आरोपी वारंवार आपले मोबाइल फोन बंद करत असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी उपलब्ध तांत्रिक माहिती आणि अन्य तपासाच्या माध्यमातून त्यांच्या हालचालींचा मागोवा घेतला.
नालासोपारा, वसई, पालघरमध्ये शोधमोहीम
आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी नालासोपारा, वसई, पालघर आणि बोईसर परिसरात तपासाची व्याप्ती वाढवली. अखेर या चोरीप्रकरणी सत्यम राजेश शुक्ला (वय २६), अनिश ब्रिजभूषण चौरसिया (वय १८) आणि पवन ओमप्रकाश धीवर उर्फ राहुल गौड (वय २६) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली.
या कारवाईत पोलिसांनी चोरीस गेलेल्या वस्तूंपैकी १०० टक्के मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत केला आहे. त्यामुळे महिलेच्या घरातून चोरीला गेलेले सर्व सोन्या-चांदीचे दागिने आणि मौल्यवान वस्तू पुन्हा मिळवण्यात मालाड पोलिसांना यश आले आहे. दिवाळीच्या साफसफाईसाठी बुक केलेल्या ऑनलाइन सेवेच्या माध्यमातूनच चोरी झाल्याने या घटनेची परिसरात चर्चा सुरू आहे.