Hingoli Youth Death: जपानच्या कुरे शहरातील कारुगा बीच पार्क येथे पोहण्यासाठी गेलेल्या हिंगोलीच्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शाम संतोष अग्रवाल (वय २५) असे मृत तरुणाचे नाव
हिंगोली (Hingoli Youth Death) : जपानच्या कुरे शहरातील कारुगा बीच पार्क येथे पोहण्यासाठी गेलेल्या हिंगोलीच्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शाम संतोष अग्रवाल (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, शाम हा आयआयटी खरगपूर येथे मास्टर ऑफ आर्किटेक्ट या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत होता. आयआयटी एक्सचेंज कार्यक्रमांतर्गत त्याची सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली होती. त्यानुसार तो मागील महिन्यात जपानमधील हिरोशिमा विद्यापीठात गेला होता.
दरम्यान, एका कॉन्फरन्ससाठी तो रविवार, ३० ऑगस्ट रोजी कुरे शहरात गेला होता. तेथून तो मित्रांसोबत कारुगा बीच पार्कच्या समुद्रकिनारी गेला. यावेळी तो ब्रेकवॉटरवरून पाण्यात उतरला, मात्र परत वर आलाच नाही. काही वेळाने जीव रक्षकाला एक तरुण पाण्यावर तरंगताना दिसला. त्याला तातडीने बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या (Hingoli Youth Death) घटनेची माहिती त्याच्या कुटुंबियांना ३१ ऑगस्ट सोमवार रोजी मिळाली. या घटनेने कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे. शामचा मृतदेह जपानहून भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू असून त्यासाठी सहा ते सात दिवस लागणार आहेत. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
शामचे प्राथमिक शिक्षण हिंगोलीतील एका इंग्रजी शाळेत झाले. बारावीपर्यंतचे शिक्षण विवेकानंद महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे झाले. त्यानंतर त्याने एनआयटी भोपाळ येथून आर्किटेक्टची पदवी घेतली व पुढील शिक्षणासाठी आयआयटी खरगपूर येथे प्रवेश घेतला होता. अभ्यासात हुशार आणि मनमिळावू म्हणून तो मित्रांमध्ये प्रसिद्ध होता. त्याचे कुटुंब काही वर्षांपूर्वीच छत्रपती संभाजीनगर येथे स्थायिक झाले असून त्याच्या पश्चात वडील, भाऊ, वहिनी असा परिवार आहे.