MLA Santosh Bangar: शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी निघणाऱ्या भव्य कावड यात्रेत यंदाही हिंदू-मुस्लीम ऐक्याचे विलोभनीय दर्शन घडले.
उपनगराध्यक्ष अ. माबुद बागवान मित्र मंडळाकडून शिवभक्तांचे भव्य स्वागत
हिंगोली (MLA Santosh Bangar) : शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी निघणाऱ्या भव्य कावड यात्रेत यंदाही हिंदू-मुस्लीम ऐक्याचे विलोभनीय दर्शन घडले. कळमनुरी शहराजवळील चिंचाळेश्वर महादेव मंदिरापासून सुरू होणारी ही पारंपारिक कावड यात्रा यंदा २४ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात काढण्यात आली होती. या यात्रेचे हिंगोली शहरात उपनगराध्यक्ष अ. माबुद बागवान मित्र मंडळाकडून भव्य स्वागत करण्यात आले.
आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांच्या नेतृत्वाखाली ही कावड यात्रा गेल्या अनेक वर्षांपासून काढली जाते. चिंचाळेश्वर महादेव मंदिरात विधिवत पूजा करून या यात्रेला सुरुवात होते. कळमनुरी ते हिंगोली हा सुमारे १८ ते २० किलोमीटरचा पायी प्रवास करत हजारो शिवभक्त बम बम भोले आणि हर हर महादेवच्या जयघोषात हिंगोली शहरात दाखल होतात. यंदाही या यात्रेत हजारो शिवभक्त सहभागी झाले होते.
हिंगोली शहरात या यात्रेचे आगमन होताच उपनगराध्यक्ष अ. माबुद बागवान मित्र मंडळाने मुख्य चौकात भव्य स्वागताची व्यवस्था केली होती. या ठिकाणी उपनगराध्यक्ष अब्दुल माबुद बागवान यांनी संपूर्ण बागवान बिरादरीला सोबत घेऊन शिवभक्तांचे फुलांची उधळण करून स्वागत केले. पायी चालून आलेल्या भाविकांसाठी मंडळाच्या वतीने ६० हजार केळी आणि १० हजार पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. या सेवाकार्यात मंडळाचे असंख्य मुस्लीम कार्यकर्ते आणि युवक दिवसभरापासून कार्यरत होते.
या यात्रेचा आणि औंढा नागनाथ यात्रेचा कोणताही संबंध नसून, ही यात्रा पूर्णपणे आमदार संतोष बांगर यांच्या पुढाकारातून चिंचाळेश्वर ते हिंगोलीतील अमृतेश्वर महादेव मंदिर दरम्यान अशी काढली जाणारी कावड यात्रा आहे. हिंगोली शहरात या यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत केले जाते, मात्र बागवान मित्र मंडळाने केलेले स्वागत यंदा विशेष चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरले.
यावेळी उपनगराध्यक्ष अब्दुल माबुद बागवान यांनी बोलताना सांगितले की, हिंगोली हे नेहमीच सामाजिक सलोख्याचे शहर राहिले आहे. श्रावण महिन्यात शिवभक्तांची सेवा करणे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. धर्मापेक्षा माणुसकी मोठी आहे हाच संदेश आम्हाला या माध्यमातून द्यायचा आहे. मुस्लीम बांधवांनी केलेल्या या स्वागतामुळे यात्रेतील शिवभक्तांनीही समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले.