हिंगोली (Hingoli School Computer Lab) : डिजिटल युगात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानापासून वंचित ठेवता येणार नाही, त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांमध्ये उच्च-गती इंटरनेट सुविधा, सुसज्ज संगणक प्रयोगशाळा तसेच कायमस्वरूपी प्रशिक्षित संगणक शिक्षक उपलब्ध करून देण्यात यावेत, अशी मागणी नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया, हिंगोली शहरच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
आज संगणकाचे ज्ञान, इंटरनेटचा वापर (Hingoli School Computer Lab) आणि डिजिटल कौशल्ये ही शिक्षणाचा अविभाज्य भाग बनली आहेत. केंद्र व राज्य शासनाकडून डिजिटल इंडिया, ई-लर्निंग, पीएम ई-विद्या, कोडिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या उपक्रमांना प्रोत्साहन दिले जात असताना जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये अद्याप पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याचे NSUI ने निदर्शनास आणून दिले. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण, ऑनलाइन अभ्यासक्रम आणि रोजगाराभिमुख संगणक कौशल्ये मिळण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होणे गरजेचे असून शहर व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणारी डिजिटल दरी त्यांच्या भविष्यावर परिणाम करत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये तंत्रज्ञानाधारित शिक्षणाला महत्त्व दिले असल्याने प्रत्येक विद्यार्थ्याला समान दर्जाचे डिजिटल शिक्षण मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे NSUI ने म्हटले आहे.
या (Hingoli School Computer Lab) निवेदनातून जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत हाय-स्पीड इंटरनेट आणि किमान १५ ते २० संगणक असलेली अद्ययावत प्रयोगशाळा उभारण्यात यावी, विद्यार्थी संख्येनुसार प्रशिक्षित संगणक शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी, जुन्या प्रयोगशाळांचे नूतनीकरण आणि देखभाल करून आवश्यक सॉफ्टवेअर उपलब्ध करून द्यावे, तसेच विद्यार्थ्यांसाठी डिजिटल साक्षरता, इंटरनेट सुरक्षा, कोडिंग आणि एआयचे नियमित प्रशिक्षण सुरू करावे आणि यासाठी जिल्हास्तरावर विशेष निधी उपलब्ध करून अंमलबजावणीसाठी विशेष समिती स्थापन करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
हे निवेदन NSUI हिंगोली शहराध्यक्ष पियुष सोनी यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आले असून यावेळी गणेश मानमोठे आणि भवदेश कांबळे उपस्थित होते. यावेळी बोलताना पियुष सोनी म्हणाले की, इंटरनेट, संगणक प्रयोगशाळा (Hingoli School Computer Lab) आणि प्रशिक्षित शिक्षक या आता चैनीच्या सुविधा नसून शिक्षणाच्या मूलभूत गरजा आहेत. हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला आधुनिक शिक्षणाची समान संधी मिळाली पाहिजे आणि प्रशासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी NSUI च्या माध्यमातून पुढील भूमिका घेतली जाईल.