चिखलदऱ्यात हिंगोलीचे नाव झळकले..
हिंगोली (Hingoli Riders) : आतापर्यंत हिंगोली म्हटलं की शेती, संत आणि राजकारण पण आता हिंगोलीचा आवाज देशाच्या बाइकिंग नकाशावरही घुमतोय. आणि यामागे आहे एका महिला राइडरची जिद्द.
हिंगोलीची अकांक्षा नंदकिशोर शर्मा आणि कळमनुरीच्या नांदापूरचा युवा राइडर अमित मोहन चव्हाण यांनी जे करून दाखवले, ते हिंगोलीसाठी नक्कीच अभिमानास्पद आहे.
२२ ऑगस्टला अमरावतीच्या चिखलदरा येथे झालेल्या देशातील सर्वात मोठ्या राइडिंग फेस्टिव्हलपैकी एक असलेल्या सीआयआरसी बर्नफेस्ट2026 मध्ये या दोघांनी हिंगोलीचे प्रतिनिधित्व केले. हिंगोली ते चिखलदरा २५६ किमी जाणे आणि २५६ किमी परत येणे, असा दोन दिवसात ५०० किमीचा प्रवास त्यांनी आपल्या मोटार सायकलवर पूर्ण केला.
देशभरातून आलेल्या बलाढ्य राइडिंग ग्रुप्समध्ये जेव्हा बॅनरवर 'हिंगोली थ्राॅटल ट्राइब' हे नाव झळकले, तेव्हा उपस्थित सर्व राइडर्सचे लक्ष हिंगोलीकडे वळले.अकांक्षा शर्मा यांनी हिंगोलीतील राइडर्स एकत्र यावेत, एकमेकांना मदत करावी, सुरक्षित राइडिंग शिकावी आणि हिंगोलीचे नाव मोठे करावे, या उद्देशाने नुकतीच ही कम्युनिटी सुरु केली आहे. बर्नफेस्ट मधील हा सहभाग म्हणजे या कम्युनिटीचे पहिले मोठे पाऊल होते.
या (Hingoli Riders) कार्यक्रमात दोन्ही राइडर्सचा सन्मान अमरावतीच्या प्रसिद्ध रायडर माॅम गुनजन गोले यांच्या हस्ते झाला. स्वतः गुनजन यांनी स्तनाच्या कर्करोगाबाबत जनजागृतीसाठी अमरावती ते लडाख ते कन्याकुमारी असा ऐतिहासिक प्रवास केला आहे.छोट्या जिल्ह्यातून आलेल्या मुलीने एवढा मोठा ग्रुप उभा करण्याचा प्रयत्न केल्याचे पाहून देशभरातील राइडर्सनी अकांक्षाचे भरभरून कौतुक केले आणि लवकरच हिंगोलीला भेट देण्याचे वचनही दिले.
मला फक्त बाइक चालवायची नाही, तर हिंगोलीतील सर्व राइडर्सना एका छताखाली आणून एक चांगली आणि जबाबदार राइडिंग संस्कृती तयार करायची आहे असे अकांक्षा शर्मा यांनी सांगितले. यापुढे हिंगोली थ्राॅटल ट्राइब च्या वतीने ग्रुप राइड्स, लांब पल्ल्याच्या राइड्स आणि सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत. हिंगोलीसाठी हा एका नव्या पर्वाची सुरुवात आहे.