हिंगोली (Hingoli Ration Shop) : ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉप डिलर्स फेडरेशन, पुणे यांनी सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी पुकारलेल्या एकदिवसीय ई-पॉस मशीन बंद आणि धान्य वितरण बंद आंदोलनात हिंगोली जिल्हाही सहभागी होणार आहे. त्यामुळे सोमवारी जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकाने बंद (Hingoli Ration Shop) राहणार आहेत.
हिंगोली जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष भिक्कूलालजी बाहेती, सचिव अशोक काळे आणि उपाध्यक्ष फारुक खान पठाण यांनी याबत आवाहन केले आहे. स्वस्त धान्य दुकानावर ऑनलाईन पद्धतीने धान्य वितरणासाठी वापरण्यात येणारी ई-पॉस (Electronic Point Of Sale Device) मशीन अत्यंत संथ गतीने काम करत आहे. वारंवार सर्व्हर डाऊन, इन-बिल्ट सिम आणि नेटवर्क समस्या, आधार प्रमाणीकरण रद्द होणे, ओटीपी जनरेट न होणे, ओटीपी प्रमाणीकरण न होणे, केवायसी न होणे अशा अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे धान्य वितरणात अडथळा निर्माण होत असून दुकानदार आणि लाभार्थी दोघेही अडचणीत सापडत आहेत.
या गंभीर समस्येकडे शासनाने लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा, या मागणीसाठी एक दिवसाचे लाक्षणिक बंद पुकारण्यात आले आहे. सोमवारी जिल्ह्यातील कोणत्याही रेशन दुकानावर धान्य वितरण आणि इतर कामे होणार नाहीत, असे संघटनेने स्पष्ट केले आहे.