Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली पोलीस चौकी

हिंगोलीतील आदर्श महाविद्यालयाजवळील पोलीस चौकी साडेतीन वर्षांपासून बंदच

Hingoli Police Station: आदर्श महाविद्यालय परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेली पोलीस चौकी गेल्या साडेतीन वर्षांपासून बंद अवस्थेत असल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह..


हिंगोलीतील आदर्श महाविद्यालयाजवळील पोलीस चौकी साडेतीन वर्षांपासून बंदच

Hingoli Police Station |

 

नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

हिंगोली (Hingoli Police Station) : शहरातील आदर्श महाविद्यालय परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेली पोलीस चौकी गेल्या साडेतीन वर्षांपासून बंद अवस्थेत असल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक जी. श्रीधर आणि अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या हस्ते या चौकीचे उद्घाटन करण्यात आले होते, मात्र उद्घाटनानंतर ही चौकी नियमित सुरू झालीच नाही. आज घडीला चौकीची इमारत आहे, पण तिथे पोलीसच नाहीत अशी परिस्थिती आहे.

आदर्श कॉलेजसह जिजामाता नगर, सावरकर नगर, ज्योती नगर, कमला नगर आणि सरस्वती नगर या भागात मोठी लोकवस्ती आहे. महाविद्यालयामुळे दिवसभर विद्यार्थ्यांची वर्दळ असते, तर सायंकाळनंतर महिला, कामगार आणि नोकरदार नागरिकांची ये-जा सुरू असते. रात्रीच्या वेळी या परिसरात चोरी, घरफोडी आणि अनुचित प्रकार घडण्याची भीती नागरिकांमध्ये कायम आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना तातडीने पोलिसांशी संपर्क साधता यावा आणि परिसरात पोलिसांचा वचक राहावा या उद्देशाने ही चौकी उभारण्यात आली होती. मात्र चौकीच बंद असल्याने त्याचा उद्देशच फसला आहे.

परिसरात एखादी चोरी, भांडण, छेडछाड किंवा गंभीर घटना घडल्यास नागरिकांना थेट मुख्य पोलीस ठाण्यापर्यंत धाव घ्यावी लागते. त्यामुळे घटनास्थळी पोलीस पोहोचेपर्यंत आरोपी पसार होण्याची शक्यता असते. पोलीस चौकी कार्यरत असती तर रात्रीची गस्त, संशयितांवर नजर आणि तक्रारींवर तातडीने प्रतिसाद देणे शक्य झाले असते, परंतु चौकी बंद असल्याने या सर्व बाबींवर परिणाम होत आहे.

साडेतीन वर्षांपासून चौकी बंद असताना ती सुरू करण्यासाठी नेमकी काय कार्यवाही करण्यात आली, मनुष्यबळाची कमतरता असल्यास ती कधी दूर होणार आणि चौकी सुरू करण्याची निश्चित तारीख कोणती, असे प्रश्न नागरिक विचारत आहेत. मात्र याबाबत पोलीस प्रशासनाकडून अद्याप कोणतेही उत्तर मिळालेले नाही.

घटना घडल्यानंतर चौकी (Hingoli Police Station) सुरू करण्यापेक्षा घटना घडू नये यासाठी चौकी आजच सुरू करणे गरजेचे असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. आदर्श महाविद्यालय परिसरात रात्रीची नियमित गस्त वाढवावी आणि बंद असलेली पोलीस चौकी तातडीने कार्यान्वित करून आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. जिल्हा पोलीस प्रशासन याकडे गांभीर्याने पाहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.