Hingoli Dial 112 Service: संकटात सापडलेल्या नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवण्यात हिंगोली जिल्हा पोलीस दलाने संपूर्ण महाराष्ट्रात बाजी मारली आहे. डायल ११२ या आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली
हिंगोली (Hingoli Dial 112 Service) : संकटात सापडलेल्या नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवण्यात हिंगोली जिल्हा पोलीस दलाने संपूर्ण महाराष्ट्रात बाजी मारली आहे. डायल ११२ या आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली अंतर्गत घटनास्थळी जाऊन पीडितांना मदत करण्याच्या कामगिरीमध्ये हिंगोली जिल्ह्याने ९९.१८ टक्केवारी मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
डायल ११२ ही कार्यप्रणाली सप्टेंबर २०२१ पासून महाराष्ट्रात सुरु झाली आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात डायल ११२ प्रणाली कार्यरत आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यात डायल ११२ चे प्रशिक्षण घेतलेले पोलीस अंमलदार नेमण्यात आले आहेत. सापडलेल्या ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान बालकांसह सर्व गरजूंसाठी ही सेवा फायदेशीर ठरत आहे. माहे ऑगस्ट २०२६ मध्ये डायल ११२ वर एकूण १५१९ कॉल आले होते, त्यापैकी ११३४ कॉलला प्रत्यक्ष प्रतिसाद देत पोलीस पथक घटनास्थळी धावले.
यामध्ये ३६२ महिलांना वेळीच मदत मिळाली, तर चोरीच्या ५१, रस्ते अपघाताच्या ३०, मिसिंगच्या ०५, ज्येष्ठ नागरिकांच्या ५४, गुन्ह्यांच्या ३९४ आणि इतर २३८ अशा एकूण ११३४ प्रकरणात नागरिकांना डायल ११२ ची तात्काळ मदत मिळाली आहे. जानेवारी ते जून २०२६ या कालावधीत घटनास्थळी जाऊन कारवाई करण्याच्या कामगिरीत हिंगोली जिल्हा २८ व्या क्रमांकावर होता, तर कमीत कमी वेळेत मदत पुरवण्यात ४ था क्रमांक होता. मात्र ऑगस्ट २०२६ मध्ये मोठी झेप घेत जिल्ह्याने थेट प्रथम क्रमांक मिळवला असून, जलद प्रतिसाद देण्यात राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे.
या (Hingoli Dial 112 Service) उत्कृष्ट कामगिरीसाठी पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणीक लोढा व अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नियंत्रण कक्षातील डायल ११२ चे सुपरवायझर पोउपनि कैलास मिटकरे, डिस्पॅचर संदेश नरवाडे, सुनील उगले, माधव कोरडे, सुनील राठोड, राजेश बुरकुले, सतिष कोरडे, इंजिनिअर ज्ञानेश्वर सावंत, भुजंग भालेगाव व सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व डायल ११२ च्या अंमलदारांनी उत्कृष्ट कर्तव्य बजावले आहे.