हिंगोली (Hingoli Nationalist Congress Party) : महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ४४ अन्वये तिसरे अपत्य झाल्याच्या कारणावरून हिंगोली नगर परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य हाशमी सय्यद बासिद हाशमी सय्यद हबीब यांना अपात्र घोषित करण्याचा आदेश जिल्हाधिकारी हिंगोली यांनी पारित केला आहे.
या (Hingoli Nationalist Congress Party) प्रकरणी अर्जदार शेख नईम शेख लाल यांनी महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम १९६५ मधील कलम ४४ अन्वये गैरअर्जदार हाशमी सय्यद वासित यांना विहित दिनांकानंतर तिसरे अपत्य झाल्याने सदस्यपदासाठी अपात्र घोषित करावे, असा अर्ज सादर केला होता. अर्जदाराचे म्हणणे असे होते की, गैरअर्जदार हे २२ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या निवडणुकीत प्रभाग क्र. १४ मधून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी २६ नोव्हेंबर २०२५ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करताना शपथपत्रात त्यांना केवळ दोन अपत्ये असल्याचे नमूद केले होते.
त्यामध्ये तस्लीम फातिमा जन्म ७ मार्च २००४ आणि सय्यद साद जन्म १६ मार्च २००७ यांचाच उल्लेख केला होता. तर अन्य दोन अपत्ये सय्यद उम्मे-रुमान जन्म २५ फेबु्रवारी २००९ आणि सय्यद हम्माद जन्म २० ऑगस्ट २०१३ यांची माहिती जाणीवपूर्वक लपविली होती. तसेच गैरअर्जदाराने त्यांच्या तिसर्या व चौथ्या अपत्याची पितृत्वासंबंधीची नोंद स्वतःच्या भावाच्या नावावर शाळेच्या दप्तरी लावल्याचा आरोप करण्यात आला होता. डॉ. एकबाल उर्दू स्कूलच्या मूळ नोंदणीमध्ये वडिलांचे नाव सय्यद बासिद असे असताना नंतर खाडाखोड करून सय्यद अतीक किंवा सय्यद खलील अशी नावे नोंदविण्यात आल्याचे आणि भावाचे अपत्य सय्यद उम्मे-रुमान हिचे नाव स्वतःची मुलगी म्हणून नोंदविण्यासाठी न्यायालयात फौजदारी अर्ज क्र. ४४३/२०२० दाखल करून आदेश प्राप्त केल्याचा आरोप अर्जदाराने केला होता.
याबाबत गैरअर्जदारांना ३० जून २०२६ रोजी नोटीस निर्गमित करण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी लेखी म्हणणे २७ जुलै २०२६ रोजी सादर केले. त्यांचे म्हणणे असे होते की, त्यांना १२ सप्टेंबर २००१ नंतर केवळ दोनच अपत्ये असून सय्यद उम्मे-रुमान व सय्यद हम्माद ही त्यांच्या भावाची अपत्ये आहेत आणि शाळेच्या अभिलेखात फेरफार झालेला नाही. शाळेतील प्रवेश नोंदीमध्ये पालकांच्या नावाची चुकिची नोंद झाल्याने दुरुस्ती करण्यात आली होती, असा दावा त्यांनी केला. मात्र दोन्ही पक्षकारांना वैयक्तिक सुनावणीची संधी देऊन सादर करण्यात आलेली कागदपत्रे, जन्म नोंद उतारे, शपथपत्रे आणि अभिलेखाची तपासणी करण्यात आली.
नगर परिषद हिंगोलीकडून (Hingoli Nationalist Congress Party) माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार गैरअर्जदार यांच्या नावासह २० ऑगस्ट २०१३ रोजी जन्म नोंद झालेल्या बालकाचा अनुक्रमांक ३६८३ असून त्यात वडिलांचे नाव सय्यद बासिद आणि आईचे नाव उम्मेहानी नगमू असे नमूद आहे. तसेच डॉ. एकबाल उर्दू स्कूलच्या प्रवेश निर्गम रजिस्टर पान क्र. १४१ चे अवलोकन केले असता प्रवेश अनु. क्रमांक ६११९ वर सय्यद उम्मे रुमान सय्यद बासिद आईचे नाव उम्मेहानी असे नोंद असून नंतर वडिलांच्या नावास आळा मारून त्याठिकाणी अतीक आणि आईच्या नावास आळा मारून सालेहा बेगम अशी नोंद केल्याचे दिसून येते. तसेच नगर परिषदेच्या जन्म अहवालानुसार वडिलांचे नाव सय्यद बासिद असल्याचे स्पष्ट होते.
उपलब्ध अभिलेख, दस्तऐवजी पुरावे आणि कायद्याच्या तरतुदींचा विचार करता गैरअर्जदार हाशमी सय्यद बासिद यांना कायद्यात विहित दिनांकानंतर तिसरे अपत्य झाल्याचे सिद्ध होत असल्याने ते महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १६(१)(के) अन्वये सदस्य म्हणून राहण्यास अपात्र ठरतात, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यामुळे राहुल गुप्ता, जिल्हाधिकारी हिंगोली यांनी महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम १९६५ चे कलम ४४ मधील अधिकारांचा वापर करून गैरअर्जदार हाशमी सय्यद बासिद यांना अपात्र घोषित करण्याचा आदेश पारित केला आहे.
परिणामी नगर परिषद हिंगोली येथील त्यांचे सदस्यपद या आदेशाच्या दिनांकापासून रिक्त झाल्याचे घोषित करण्यात आले आहे आणि मुख्याधिकारी नगर परिषद हिंगोली यांना तात्काळ अंमलबजावणी करून पुढील वैधानिक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सदर आदेशाविरुद्ध कायद्यानुसार सक्षम न्यायालयात उपाययोजना करण्याचा अधिकार संबंधित पक्षकारास राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
यापूर्वीही राकॉच्या एका महिला नगरसेविकेचे सदस्यत्व पद रद्द
हिंगोली नगर पालिकेतील (Hingoli Nationalist Congress Party) राष्ट्रवादी काँग्रेसच्या वार्ड क्र.१३ मधील महिला नगरसेविका रूबिना मोहम्मद वाजीद यांचेही सदस्यत्वपद तिसर्या अपत्याच्या कारणावरून जिल्हाधिकारी राहूल गुप्ता यांनी २३ जून २०२६ रोजी रद्द करण्यात आले होते. या संदर्भात त्यांनी आदेशही काढला होता. त्यानंतर आता हिंगोली नगर पालिकेतील प्रभाग क्र. ७ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक हाश्मी सय्यद बासिद हाशमी सय्यद बाशिद यांचेही सदस्यत्व पद रद्द करण्यात आले. या संदर्भात २ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आदेश काढले आहेत. आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांचे सदस्यत्वपद रद्द झाले आहेत.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला हा फार मोठा राजकीय दृष्ट्या हादरा बसला आहे.