अभिलेख अद्यावत न करता दस्त नोंदणी केल्यास कायदेशीर कारवाई
हिंगोली (Hingoli Land Plot Document Registration) : जिल्हा निबंधक, दुय्यम निबंधक कार्यालयाच्या स्तरावर मंजूर लेआऊट, कमी जास्त पत्रक असतानाही व्यवहारात गैर प्रकार होऊ शकतात. यामध्ये भूखंडांची दुहेरी नोंदणी, खुल्या जागांची बेकायदेशीर विक्री आणि रस्त्यांच्या जागेवर भूखंड पाडून विक्री करण्याचे प्रकार होऊ शकतात, अशा बाबी होऊ नयेत, यासाठी जिल्हा प्रशासनाने महसुली अभिलेख अद्ययावत करण्याच्या सूचना सह जिल्हा निबंधक यांना दिल्या आहेत. अभिलेख अद्ययावत नसताना खरेदी विक्री व्यवहाराची दस्त नोंदणी करताना आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मंजूर विकास योजना व प्रादेशिक योजनेतील जमिनीवर मंजूर लेआऊटनुसार भूखंडांची खरेदी-विक्री करताना, प्रत्येक भूखंडाला कमी-जास्त पत्रकानुसार स्वतंत्र सातबारा उपक्रमांक किंवा प्रॉपर्टी कार्ड (पीआर कार्ड) मिळाल्यानंतरच त्या भूखंडाची दस्त नोंदणी करावी. तोपर्यंत वैयक्तिक भूखंडांच्या खरेदी-विक्री व्यवहारांची नोंदणी करू नये. खरेदी खतासोबत सक्षम प्राधिकरणाने मंजूर केलेल्या लेआऊटमधील त्या विशिष्ट प्लॉटचा चौहद्दीसह नकाशा, कमी जास्त पत्रकानुसारचा नकाशा, अद्यावत सातबारा जोडणे कायदेशीररित्या सक्तीचे करावे. मंजूर लेआऊटमधील रस्ते, मोकळी जागा, सुविधा क्षेत्रे उपक्रमांकनिहाय सातबाऱ्यामध्ये प्रतिबंधित मालमत्ता म्हणून नोंदवावीत.
विविध वापराच्या प्रयोजनासाठी मंजुरी दिलेल्या लेआऊटमधील भूखंडाच्या खरेदी-विक्री व्यवहारांची दस्त नोंदणी कमी-जास्त पत्रकानुसार अद्यावत केलेल्या सातबारानुसार असल्यास करावी. मंजूर लेआऊटची कमी जास्त पत्रकानुसार स्वतंत्र सातबारा, पीआर कार्ड तयार नाही, अशा भूखंडाचे अभिलेख अद्यावत केल्यानंतरच दस्त नोंदणी करावी, असेही जिल्हा प्रशासनाने सह जिल्हा निबंधकांना कळवले आहे. याबाबत सर्व दुय्यम निबंधकांनाही निदर्शनास आणून द्यावे, असेही जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. तसेच याबाबत महसूल, भूमिलेख विभागांनीही आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.