हिंगोली (Hingoli Illegal Mineral Mining) : औंढा नागनाथ तालुक्यातील अनखळी शिवारातील पूर्णा नदीच्या पात्रात किन्ही यंत्राच्या सहाय्याने अवैध रित्या गौण खनिजाचे उत्खनन सुरू असताना अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मिना यांच्या पथकासह औंढा नागनाथ पोलिसांनी २० सप्टेंबर रोजी छापा मारून ट्रॅक्टर हेडसह यंत्र असा एकूण ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या जिल्हाभरात अवैध धंद्यांसह रेती तस्करी विरुद्ध कारवाईचे सत्र सुरू आहे. अनखळी शिवारात पूर्णा नदीच्या पात्रात अवैध रित्या रेतीचे उत्खनन होत असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने २० सप्टेंबर रोजी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास पूर्णा नदीच्या पात्रात छापा टाकला. त्यावेळी ट्रॅक्टर व किन्ही यंत्राच्या सहाय्याने अवैध रित्या रेतीचे उत्खनन सुरू होते व रेतीचा साठा केला जात होता.
या (Hingoli Illegal Mineral Mining) कारवाईत पोलिसांनी ५ लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर हेड आणि १ लाख रुपये किमतीचे किन्ही यंत्र असा एकूण ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात किशोर पारिसकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आदिनाथ ज्ञानेश्वर डोंबे, रा. अनखळी, ता. औंढा नागनाथ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रविकांत हरकाळ हे करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणीक लोहा आणि अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मिना यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील संदिप पवार, अर्जुन यादव आणि सतिश नरवाडे तसेच औंढा नागनाथ पोलीस ठाण्यातील रविकांत हरकाळ, किशोर पारीसकर यांनी केली आहे.