३९६३ मतदारांनी मतदानाकडे फिरवली पाठ
उमेदवारासह समर्थकांची एका एका मतासाठी धावाधाव
हिंगोली (Hingoli Graduate Constituency Election) : ५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ साठी आज दिनांक २३ ऑक्टोबर रोजी हिंगोली जिल्ह्यात झालेल्या मतदानाची तात्पुरती टक्केवारी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार हिंगोली जिल्ह्यात एकूण ३६ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. यामध्ये तालुका निहाय हिंगोली १०, कळमनुरी ७, सेनगाव ६, वसमत ९, औंढा नागनाथ ४ मतदान केंद्र होते. मतदार यादीनुसार जिल्ह्यात एकूण १० हजार ३१५ मतदार होते. यामध्ये ८ हजार ३३७ पुरुष, १ हजार ९७८ महिला मतदारांचा समावेश होता. सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत झालेल्या मतदानात एकूण ६ हजार ३५२ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ५ हजार ३५८ पुरुष आणि ९९४ महिला मतदारांचा समावेश आहे.
टक्केवारीनुसार हिंगोली (Hingoli Graduate Constituency Election) जिल्ह्यात एकूण ६१.५८ टक्के मतदान झाले असून पुरुष मतदारांची टक्केवारी ६४.२७ टक्के तर महिला मतदारांची टक्केवारी ५०.२५ टक्के इतकी नोंदवण्यात आली असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रगती चोंडेकर यांनी दिली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यासोबतच मतदान केंद्राच्या बाहेर उमेदवारांच्या समर्थकांचे मंडप उभारण्यात आले होते. एका एका मतासाठी समर्थकांची धावाधाव झाली.
काही मतदारांची उदासिनता
पदवीधर मतदार हा सुशिक्षीत मतदार म्हणुन ओळखल्या जातो. परंतु या मतदानाच्या प्रक्रीयेत ३९६३ मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली. विशेष म्हणजे जिल्ह्यात मतदान केंद्राची संख्या अपुरी असल्याने तसेच काही ग्रामीण भागातील मतदार दुर अंतरावर असल्याने त्यांनी मतदान करण्याकरीता निरूत्साह दाखविला. निवडणूक विभागाने जिल्ह्यात आणखी मतदान केंद्र वाढविले असते तर मतदानाचा टक्का वाढला असता अशा काही प्रतिक्रीया पदवीधर मतदारांनी बोलताना व्यक्त केल्या.