Hingoli Dussehra Festival: देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा व प्रसिद्ध मानला जाणारा हिंगोलीचा ऐतिहासिक सार्वजनिक दसरा महोत्सव २०२६ प्रशासनामार्फतच साजरा करावा
व्यापारी व नागरिकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
हिंगोली (Hingoli Dussehra Festival) : देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा व प्रसिद्ध मानला जाणारा हिंगोलीचा ऐतिहासिक सार्वजनिक दसरा महोत्सव २०२६ प्रशासनामार्फतच साजरा करावा, या मागणीचे निवेदन व्यापारी व नागरिकांच्या वतीने ३१ ऑगस्ट सोमवार रोजी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांना देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की हा महोत्सव साधारण पंधरा दिवस चालतो. रामलीला कृषी व औद्योगिक प्रदर्शन हे त्याचे मुख्य आकर्षण आहे. विजयादशमीच्या दिवशी होणाऱ्या रावण दहन सोहळ्यासाठी बाहेरगावाहून एक लाखापेक्षा जास्त भाविक येतात. रामलीला मैदानावर कुस्ती, क्रिकेट, सायकल रेस, कबड्डी, टेबल टेनिस, लॉन टेनिस, हॉलीबॉल, फुटबॉल, कराटे, बुद्धिबळ, गीत गायन, भजनी मंडळ स्पर्धा, कीर्तन, आदर्श कुटुंब स्पर्धा, महिला मंडळाच्या विविध स्पर्धा अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, ज्यातून स्थानिक कलावंत व खेळाडूंना व्यासपीठ मिळते.
मात्र यंदा महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी हिंगोली व सचिव तहसीलदार हिंगोली यांनी मतदार यादी पुनरिक्षण, ग्रामपंचायत निवडणुका व संभाव्य जि.प. व पं.स. निवडणुकांमुळे महसूल यंत्रणेवर ताण असल्याने उत्सव साजरा करणे अशक्य असल्याचे पत्र जिल्हा प्रशासनाला दिले आहे. यावर जिल्हाधिकारी व धर्मदाय आयुक्त यांनी कोणतीही भूमिका न घेतल्याने महोत्सवाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
यापूर्वी कधीही कोणत्याही अधिकाऱ्याने महोत्सव न साजरा करण्याची भूमिका घेतलेली नाही. पूर्वीचे अधिकारी महसुली कामे सांभाळूनही उत्सव उत्साहात साजरा करत होते. गेल्यावर्षी ऑगस्टमध्येच टेंडर व पूर्वतयारी सुरू झाली होती, मात्र यंदा कोणतीच हालचाल दिसत नाही.
हा (Hingoli Dussehra Festival) महोत्सव बाह्य यंत्रणेमार्फत दर्जेदारपणे साजरा करणे अशक्य आहे. दरवर्षी नागरिक प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून सहभागी होतात. त्यामुळे महसूल प्रशासनावरील ताण कमी करण्यासाठी प्रतिष्ठित नागरिक, स्वयंसेवी संस्था व उत्सवप्रेमी कार्यकर्त्यांना अधिक जबाबदाऱ्या देऊन त्यांचे सहकार्य घ्यावे, पण मुख्य नियंत्रण व नियोजन प्रशासनानेच ठेवावे आणि महोत्सव दरवर्षीप्रमाणे उत्साहात साजरा करण्याचा ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर चंद्रकांत लव्हाळे, गणेश बांगर, शिवाजी इंगोले, मधुकर खंडागळे, राजेंद्र हलवाई, पवन ठाकूर, अरुण दिपके, रमेश गंगावणे, दतराव बांगर, भरत चौधरी, रतनलाल सपकाळ आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत