हिंगोली (Hingoli Cyber Cell) : सणासुदीच्या काळात नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन सायबर सेलतर्फे करण्यात आले आहे. दिवाळीच्या नावाखाली बनावट लिंकद्वारे सायबर फसवणुकीचा धोका वाढला असून २,००० रुपयांच्या आमिषाला बळी पडू नका, असे सायबर सेलने स्पष्ट केले आहे.
सध्या मोबाईलवर एअरटेल दिवाळी विशेष ऑफरच्या नावाने एक संदेश फिरत आहे. तुमच्यासाठी २,००० रुपये दिवाळी कॅश गिफ्ट असून तुमचे बँक खाते क्रेडिट करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, असा मजकूर त्या संदेशात असतो. त्या संदेशात दिलेली लिंक पाहताना ती खरी वाटते, मात्र ती बनावट असते. ही कोणतीही अधिकृत एअरटेल ऑफर नसून सायबर फसवणुकीसाठी पाठवला जाणारा बनावट संदेश आहे, असे सायबर सेलने म्हटले आहे.
अशा प्रकारच्या संदेशावर क्लिक केल्यानंतर समोर एक वेबपेज उघडते. त्यावर नाव, मोबाईल नंबर, बँक खाते क्रमांक, ओटीपी किंवा युपीआय पिन टाकण्यास सांगितले जाते. एकदा का ही माहिती भामट्यांच्या हाती गेली की अवघ्या काही मिनिटांत बँक खात्यातून पैसे काढले जातात. काही वेळा मोबाईलमध्ये व्हायरस टाकून फोनमधील सर्व माहिती चोरली जाते. त्यामुळे दिवाळीचे गिफ्ट मिळण्याऐवजी आपलीच जमा रक्कम गमावण्याची वेळ येते. सणासुदीच्या काळात लोकांच्या मनात आनंदाचे वातावरण असते आणि ऑफरची घाई असते. याचाच फायदा भामटे घेतात, असे सायबर सेलने सांगितले आहे.
अनोळखी नंबरवरून आलेला संदेश, अनोळखी लिंक आणि खोट्या ऑफर यावर अजिबात विश्वास ठेवू नका, असे आवाहन सायबर सेलतर्फे करण्यात आले आहे. कोणतीही टेलिकॉम कंपनी किंवा बँक मोबाईलवर लिंक पाठवून ओटीपी, युपीआय पिन किंवा बँक तपशील मागत नाही. त्यामुळे असा संदेश आला तर त्यावरील लिंकवर क्लिक करू नका. ओटीपी, युपीआय पिन किंवा बँक तपशील कोणालाही शेअर करू नका. ऑफरची अधिकृत खात्री केल्याशिवाय विश्वास ठेवू नका. संशयास्पद संदेश आला तर तो त्वरित डिलीट करा आणि इतरांनाही त्याबाबत सावध करा.
चुकून अशा लिंकवर क्लिक केले असेल किंवा माहिती शेअर केली असेल तर घाबरून न जाता तात्काळ आपल्या बँकेला संपर्क करून खाते गोठवावे आणि जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा सायबर सेलकडे तक्रार नोंदवावी. तसेच सायबर हेल्पलाईनवर तक्रार केल्यास पैसे परत मिळण्याची शक्यता वाढते. वेळीच तक्रार केल्यास भामट्यांचे खाते गोठवता येते, असेही सायबर सेलने म्हटले आहे.
दिवाळी हा आनंदाचा सण आहे. तो साजरा करताना आपली एक छोटीशी चूक आपले मोठे आर्थिक नुकसान करू शकते. त्यामुळे कोणत्याही आमिषाला बळी न पडता सतर्क राहा आणि आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांनाही याबाबत माहिती द्या, असे आवाहन (Hingoli Cyber Cell) सायबर सेलतर्फे करण्यात आले आहे.