हिंगोली (Hingoli City Police) : नाव माहीत नव्हते, गाव माहीत नव्हते, नातेवाईक कोण हेदेखील माहीत नव्हते. पण एका अनोळखी माणसाला शेवटच्या प्रवासात एकटे सोडणे हिंगोली शहर पोलिसांना मान्य नव्हते. त्यामुळे ओळख न पटलेल्या त्या अनोळखी पुरुषावर रिसाला बाजार स्मशानभूमीत अत्यंत सन्मानपूर्वक अंत्यविधी करण्यात आले.
हिंगोली शहरातील सिद्धार्थ नगर भागात संत स्वस्त भांडार जवळ एक नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजून दहा मिनिटांच्या सुमारास एक मृतदेह असल्याची माहिती हिंगोली शहर पोलिसांना मिळाली त्यावरून पोलीस उपनिरीक्षक गजानन साखरे यांच्यासह अशोक धामणे शेख मोहसीन, दिलीप लेकुळे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची ओळख पटली नसल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या शवगृहात हा मृतदेह ठेवण्यात आला. सदरील व्यक्तीचा मृत्यू भूकमारीने किंवा इतर कोणत्यातरी अज्ञात कारणाने झाला असल्या बाबतची माहिती हिंगोली शहर परिसरात पोलीस शिपाई सुधाकर जाधव यांनी दिल्याने आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. या अनोळखी पुरुषाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी सर्व प्रयत्न केले. मात्र, अद्यापपर्यंत त्याची ओळख पटू शकली नाही.
शेवटी नियमानुसार आणि माणुसकीच्या भावनेतून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला.पोलीस निरीक्षक देवेंद्र सिंह ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजानन साखरे, पोलीस शिपाई डोंगरदिवे, पोलीस शिपाई दिलीप लेकुळे यांच्यासह महसूल विभागाचे तलाठी अनिल काळे, महसूल सेवक सचिन राठोड आणि नगरपरिषद विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.
रिसाला बाजार स्मशानभूमी येथे 4 नोव्हेंबर रोजी सर्व विधीवत पद्धतीने त्याच्यावर अंत्यविधी करण्यात आला. ज्याला या जगात कोणी आपले म्हणणारे नव्हते, त्याला शेवटच्या क्षणी हिंगोलीकरांनी आपले मानले. पोलिसांच्या या माणुसकीच्या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. ओळख नसली तरी प्रत्येक मृतदेहाला सन्मान मिळायलाच हवा, हाच संदेश या अंत्यविधीतून देण्यात आला. या अनोळखी पुरुषाबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.