Hingoli Bus Route: शहरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने जड वाहनांच्या वाहतूक मार्गात तात्पुरता बदल केला आहे.
हिंगोली (Hingoli Bus Route) : शहरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने जड वाहनांच्या वाहतूक मार्गात तात्पुरता बदल केला आहे. यानुसार वाशिम, अकोला आणि अमरावतीकडे जाणार्या व येणार्या सर्व एस.टी. बसेसचा मार्ग वळवण्यात आला आहे.
हिंगोली आगारातर्फे देण्यात आलेल्या अधिकृत माहिती नुसार, हा बदल १९ ऑगस्ट पासून पुढील एक महिन्यासाठी लागू राहणार आहे. शहरातील रेल्वे ब्रीज ते छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि बासंबा कॉर्नर बायपास ते बळसोंड या मुख्य रस्त्यांवर सुरू असलेल्या कामामुळे या मार्गावरून जड वाहने आणि एस.टी. बसेसना तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.नवीन नियमानुसार वाशिम, अकोला, अमरावतीकडे जाणार्या एस.टी. बसेस आता हिंगोली शहरात न जाता थेट मुख्य हिंगोली बस स्थानक, नांदेड नाका, खटकाळी बायपास, सावरखेडा बायपास आणि सावरखेडा ब्रीज (राष्ट्रीय महामार्ग १६१) मार्गे बासंबा बायपास कॉर्नर कडे मार्गस्थ होत आहेत. याच मार्गाने येणार्या बसेस देखील हिंगोलीत दाखल होतील.
त्यामुळे प्रवाशांनी काही दिवसांसाठी जुन्या शहरांतर्गत असलेल्या पीपल्स बँक, रिसाला बाजार नाका किंवा अकोला बायपास या थांब्यांवर थांबू नये. वाशिम, अकोला किंवा अमरावतीसाठी एस.टी. बस पकडायची असल्यास मुख्य हिंगोली बस स्थानक, कलेक्टर ऑफीस, खटकाळी बायपास किंवा सावरखेडा बायपास (एन.एच. १६१) जवळील अधिकृत थांब्याचा वापर करावा, असे आवाहन हिंगोली आगारातर्फे करण्यात आले आहे.