हिंगोली (Hingoli Arson Case) : शहरातील मारवाडी गल्ली भागात एका घरामध्ये साठवणूक केलेल्या फटाक्यांच्या गोदामाला आग लागून मोठी दुर्घटना घडली होती. ज्यामध्ये काही जणांचा मृत्यू झाला. तर काहीजण गंभीररित्या भाजले. त्यामुळे इंडीयन मेडीकल असोशिएशन हिंगोलीच्या वतीने जळीत कांडातील तीन मयतांच्या कुटूंबीयांना आर्थिक मदत धनादेशाव्दारे दिली.
हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली भागात ५ ऑक्टोंबर रोजी रात्री ८ च्या सुमारास विजयकुमार बासटवार यांच्या निवासस्थानात साठवणूक केलेल्या फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग लागली होती. घटनास्थळी मदतीसाठी धाऊन आलेला अविनाश बांगर हा गंभीररित्या भाजून त्याचा जागेवरच मृत्यू झाला होता. यामध्ये अनेकजण गंभीर भाजल्याने त्यांना तात्काळ लातूर व संभाजी नगर आणि हिंगोली येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते. यामध्ये लातूर येथील रुग्णालयात हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील दिलीप दोडके व आकाश सांगळे या दोन कर्मचार्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या कुटूंबीयावर आभाळ कोसळले.
या (Hingoli Arson Case) दुर्दैवी घटनेमुळे हिंगोली शहरावर शोककळा पसरली होती. सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उद्देशाने इंडीयन मेडीकल असोशिएशनच्या वतीने जळीतग्रस्तांच्या कुटूंबीयांना आर्थिक मदत करण्याचा निश्चय करण्यात आला. त्यानुसार संघटनेच्या सर्व पदाधिकार्यांना आर्थिक मदतीकरीता अध्यक्ष डॉ. शिवाजी गिते, सचिव डॉ. नितीन पुरोहीत, माजी अध्यक्ष डॉ. जयदिप देशमुख, उपाध्यक्ष डॉ. मनिष बगडीया यांच्यासह इतर पदाधिकार्यांनी आवाहन केले. त्यानुसार इंडीयन मेडीकल असोशिएशनकडे आर्थिक मदतीची रक्कम जमा झाली. त्यामुळे अविनाश बांगर, दिलीप दोडके, आकाश सांगळे यांच्या कुटूंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केल्यानंतर प्रत्येकी २५ हजार २०० रुपयाचा धनादेश असोशिएशनचे अध्यक्ष डॉ शिवाजी गिते व माजी अध्यक्ष डॉ. जयदिप देशमुख यांनी दिला.
इतर संघटनांनी पुढाकार घ्यावा
हिंगोली शहरामध्ये जळीत कांडाची ही पहिली मोठी दुर्दैवी घटना घडली. ज्यांच्यावर कुटूंबीयाची उपजिवीका होती अशा व्यक्तींचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे या कुटूंबीयावर आभाळ कोसळले. सामाजिक बांधिलकीच्या हेतूने इतर संघटनांनी या कुटूंबीयांना आर्थिक मदत करण्याची गरज आहे. अशा मदतीकरीता इंडीयन मेडीकल असोशिएशनने पुढाकार घेऊन तीन मयतांच्या कुटूंबीयांना आर्थिक मदत केली.