राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना आज पुण्यातील रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. आता ते पुण्यातील रुग्णालयातून थेट मुंबईच्या दिशेने रवाना झाले असून, बारामती येथील निवासस्थानी न जाता सिल्व्हर ओक या त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाणार आहेत. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रतिभा पवार त्यांच्यासोबत आहेत.
शरद पवार यांची दोन दिवसांपूर्वी अचानक प्रकृती बिघडली होती. त्यांना कफ आणि थकवा जाणवत असल्याने तातडीने पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू करत विविध वैद्यकीय तपासण्याही केल्या होत्या. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचा नियोजित दुष्काळ पाहणी दौरा रद्द करण्यात आला होता. याशिवाय त्यांचे इतर सर्व नियोजित कार्यक्रमही पुढे ढकलण्यात आले होते.
#WATCH | Pune, Maharashtra: NCP-SP Chief Sharad Pawar was discharged from the Ruby Hall Clinic after two days under medical observation following complaints of pleuritic pain. https://t.co/p4icqFqwtF
— ANI (@ANI) November 4, 2026
व्हिलचेअरवरून रुग्णालयाबाहेर, कार्यकर्त्यांना अभिवादन
डिस्चार्ज मिळाल्यानंतर शरद पवार व्हिलचेअरवरून रुग्णालयाबाहेर आले. यावेळी बाहेर उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी हात उंचावून अभिवादन केले. पवार यांचे रुग्णालयाबाहेरील हे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यानंतर ते कारमधून मुंबईच्या दिशेने रवाना झाले.
दरम्यान, रुग्णालयातून निघण्यापूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी उपचार करणाऱ्या डॉक्टरांसह संपूर्ण वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे हात जोडून आभार मानले.
#WATCH | Pune, Maharashtra: Sharad Pawar family friend Vitthal Maniyar says, "His health is very good; there are no serious issues. Two days ago, he had a cough and some congestion, for which he was admitted here. He is always very mindful of his health, so he came in for a check-up. All the test reports came back positive—there was nothing concerning in them at all. He required some treatment for those two issues, and more importantly, he needed some rest. He stayed in the hospital for that rest and was actually planning to leave yesterday. However, we all requested that he stay one more day under the doctor’s supervision. He left for Mumbai this morning. He is just experiencing a bit of weakness, which will resolve once he has had some food. Soon, you will see him back among us, just as he always was..."
— ANI (@ANI) November 4, 2026
सिल्व्हर ओकवर आठ दिवस विश्रांती
डिस्चार्जनंतर शरद पवार बारामतीतील निवासस्थानी परततील, अशी चर्चा होती. मात्र, त्यांनी थेट मुंबई गाठण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील आठ दिवस विश्रांती घेणार आहेत. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर दिवाळीनंतर पुन्हा एकदा दुष्काळग्रस्त भागांचा पाहणी दौरा करण्याची शक्यता वैद्यकीय आणि राजकीय सूत्रांनी व्यक्त केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून प्रकृतीची विचारपूस
शरद पवार यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. यावेळी मोदी यांनी पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.