केंद्रा बुद्रुक (Gondhankheda Water Andolan) : सेनगाव तालुक्यातील जामठी गोंधनखेडा गट ग्रामपंचायत आहे गोंधनखेडा येथे तीव्र पाणी टंचाई भासत असून महिलांनी पाण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढून ३१ ऑक्टोबर रविवार रोजी शोले स्टाईल आंदोलन केले.
गोंधनखेडा (Gondhankheda Water Andolan) येथील ग्रामस्थांना यापूर्वी खाजगी नळाचे तीनशे रुपये महिना पाणी सुरू होते. मात्र सध्या पाणी पातळी खालावल्याने व शेतीला पाणी पुरत नसल्याने संबंधित शेतकऱ्याने गावात येणारे पाणी बंद केल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गोंधनखेडा येथे पाण्याची टाकी व खाजगी शेतामध्ये विहीर खोदून केवळ दोन वर्षांपूर्वी टेस्टिंग केली मात्र तेव्हापासून या पाण्याच्या टाकीमध्ये पाण्याचा एक थेंबही आला नसल्याने व संबंधित शेतकऱ्याने शेतातील पाणी गावामध्ये सोडण्याचे बंद केल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
यासाठी गोंधनखेडा (Gondhankheda Water Andolan) येथील महिलांनी रीतसर पंचायत समिती विभागाला निवेदन देऊन पाणी टंचाई दूर करण्याची विनंती केली मात्र दोन-तीन दिवसापासून कुठलीही प्रतिसाद मिळत नसल्याने महिलांनी चक्क पिण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले या आंदोलनाची जवळपास सात तास आंदोलनाच्या नंतर पाणीपुरवठा विभाग घटनास्थळी पोहोचले व ग्रामस्थांच्या मागण्या ऐकून घेऊन तात्पुरती पाण्याची व्यवस्था करून देण्याचे आश्वासन देण्यात आले.
या ठिकाणी ग्रामसेवक सरपंच पाणीपुरवठा सेवक कोणीच फिरकले नव्हते एकंदर आंदोलन करणाऱ्या महिला यांनी जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत खाली उतरणार नसल्याचा पवित्रा घेतला. एकंदर गोंधनखेडा येथील महिलांनी शोले स्टाईल आंदोलन करून टाकीवर चढत पाण्यासाठी आंदोलन केल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. यावेळी प्रशासनाच्या वतीने सह गटविकास अधिकारी अर. बी. होळकर जिल्हा परिषद चे बी. एस. शिंदे, कनिष्ठ अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग पी. एस. सुरुळे तसेच गोरगाव पोलीस स्टेशनचे प्रेमप्रकाश माकोडे, साहेबराव राठोड, निवृत्ती बडे, बीट जमादार आदींनी समजूत घातली.
या (Gondhankheda Water Andolan) आंदोलनामध्ये आशा शामराव ढाकरे, दीपमाला लक्ष्मण ढाकरे, कलावती केशव ढाकरे, जनाबाई गंगाराम ढाकरे, सुशीला दिलीप फुफाटे, सुनीता संतोष ढाकरे, लक्ष्मी अशोक ढाकरे, रेखा रतन ढाकरे, रेखा विष्णू ढाकरे, लीलाबाई तानाजी ढाकरे, सुनीता भगवान खिल्लारे, सुमन उत्तम खिल्लारे, आशा संजय खिल्लारे, जमुनाबाई परसराम खिल्लारे गंगुबाई तुळशीराम खिल्लारे लक्ष्मीबाई राजाराम खिल्लारे गावातील सर्वच महिलांची उपस्थिती होती.
आ. मुटकुळे यांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे
...अखेर आ. तानाजी मुटकुळे यांनी महिलांच्या आंदोलनामध्ये मध्यस्थी करून 6 नोव्हेंबर पूर्वी गोंधनखेडा येथे जामठी बुद्रुकच्या पाईपलाईन वरून पाणी देण्यात येणार असल्याचे आश्वासन दूरध्वनीवरून दिल्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले आहे.