धर्मगुरू बाबुसिंग महाराज यांच्या हस्ते गोमाता पूजन, महाआरती, गोदान संवाद यात्रा आणि महादीपोत्सव; संत-महंतांसह हजारो समाजबांधवांच्या उपस्थितीची अपेक्षा
मानोरा : बंजारा समाजाची काशी म्हणून देशभरात प्रसिद्ध असलेल्या तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे आज गुरुवारी, ५ नोव्हेंबर २०२६ रोजी वसुबारसच्या पवित्र मुहूर्तावर भव्य आणि ऐतिहासिक गोदान महासोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आद्य गोरक्षक संत सेवालाल महाराज यांच्या नावाने आयोजित हा महासोहळा दुपारी २:३० वाजता पार पडणार आहे. या सोहळ्यात धर्मगुरू बाबुसिंग महाराज यांच्या हस्ते गोमाता पूजन, महाआरती, गोदान संवाद यात्रा आणि महादीपोत्सव असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या ऐतिहासिक कार्यक्रमात हिंदू समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
१ लाख २५ हजार गोदानाचा ऐतिहासिक संकल्प
बंजारा समाजाची संस्कृती आणि गोवंश यांचे नाते प्राचीन काळापासून घट्ट जोडलेले आहे. याच परंपरेचा वारसा जपत वसुबारस आणि भाऊबीजेच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधून पोहरादेवी येथे तब्बल १ लाख २५ हजार गोदानाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या माध्यमातून गोदानाचा ऐतिहासिक संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
गोसेवा आणि गोसंवर्धनाचा संदेश देणार महासोहळा
गोसेवा, गोसंवर्धन आणि गोरक्षणाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवणे हा या महासोहळ्याच्या आयोजनामागील प्रमुख हेतू आहे. या महामहोत्सवाला राज्यातील तसेच विविध जिल्ह्यांतील आदरणीय संत-महंत, गोपालक, गोरक्षक, गोशाळांचे संचालक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
संत-महंत आणि समाजबांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन
वसुबारसच्या शुभमुहूर्तावर आयोजित करण्यात आलेल्या या धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्याला सर्व संत-महंत तसेच समाजबांधवांनी उपस्थित राहून गोसेवेच्या या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आद्य गोरक्षक संत सेवालाल महाराज गोदान महासोहळा समिती आणि अखिल भारतीय बंजारा (लमाणी) शक्तिपीठ, पोहरादेवी यांच्या वतीने करण्यात आले आहे.