पिडितेच्या तक्रारीवरुन सासरच्या मंडळीविरुध्द गंगाखेड पोलिसात गुन्हा दाखल
गंगाखेड (Gangakhed Child Marriage Case) : अल्पवयीन मुलीच्या आई- वडिलांना कर्ज फेडण्याचे प्रलोभन दाखवित धमक्या देवून बालविवाह लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पंधरा वर्षीय अल्पवयीन पिडितेच्या फिर्यादीवरुन सासर्यासह एकूण ४ जणांवर गंगाखेड पोलीस ठाण्यात अत्याचारासह पोक्सो, बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, गंगाखेड परिसरातील एका हॉटेलवर काम करणार्या परभणी येथील हॉटेल कामगाराची खळी येथील एकाने भेट घेत ओळख वाढविली. संबंधिताने माझा मुलगा लग्नाचा आहे, तुमची मुलगी द्या, असे म्हणत मागणी घातली. तेंव्हा मुलीचे वय कमी असल्याचे सांगत लग्नाला नकार देण्यात आला. त्यानंतर संबंधित इसमाने पत्नी, मुलगी, मुलगा व त्याच्या मित्रांनी पिडित मुलीच्या वडिलांना तुमच्या मुलीचे कल्याण होईल हे लग्न झाले तर तुमच्यावरील कर्जाची परतफेड करतो, असे प्रलोभन दाखविले तसेच धमकी दिली.
अल्पवयीन मुलगी (Gangakhed Child Marriage Case) तिच्या पालकांची लग्नाला संमती नसतानाही एप्रिल महिन्यात बाल विवाह लावण्यात आला. या नंतर पतीने अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार केला. सासु, नंदेने मारहाण केली. तुला आमच्या इथे राहायचे असेल तर आम्ही बोलू तसे वागावे लागेल, अशी धमकी दिली. या त्रासाला कंटाळलेल्या विवाहितेने मंगळवार ३ नोव्हेंबर रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात पती, सासू, सासरा, ननंद यांच्याविरुध्द तक्रार दिली आहे. तपास सपोनि. रामेश्वर धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. निलंगे, पोह. विनोद चव्हाण करत आहेत.