बिडगाव–पांढुर्णा–तरोडी खुर्द परिसरातील नागरिकांसाठी शिवणकर चौक व गंगा सेलिब्रेशनजवळ सुविधा
बिडगाव (Ganesh Immersion Artificial Tanks) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायत बिडगाव–पांढुर्णा–तारोडी खुर्द, वॉर्ड क्रमांक १४ मधील नागरिकांच्या सोयीसाठी गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम विसर्जन टँकची (Artificial Tanks) व्यवस्था करण्यात आली आहे. शिवणकर चौक तसेच गंगा सेलिब्रेशनजवळ हे कृत्रिम टँक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यावेळी स्थानिक नगरसेवक प्रीतम बोकडे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून विसर्जन व्यवस्थेची पाहणी केली. याप्रसंगी भाजपा बिडगाव अध्यक्ष पुंडलिक कुर्वेकर, भाजयुमो अध्यक्ष रजत पराते, रविंद्र डेकाटे, सचिन भोयर, दीपक लांबट, राजू देवगिरकर, अक्षय इंगळे, जितेंद्र इंदूरकर, प्रमोद ठवळी यांच्यासह भाजपा कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
गणेशोत्सव (Ganesh Immersion) हा श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव आहे. त्याचबरोबर पर्यावरणाचे संरक्षण करणे ही देखील प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे नागरिकांनी गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम विसर्जन टँकमध्ये करून पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन नगरसेवक प्रीतम बोकडे यांनी केले. कृत्रिम विसर्जन टँकची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल बिडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष वीरू जामगडे आणि स्वच्छता सभापती निकेश कातुरे यांचे नगरसेवक प्रीतम बोकडे यांनी आभार मानले.
“पर्यावरणाची काळजी घेऊया, बाप्पाला भक्तिभावाने निरोप देऊया!” असा संदेश देत नागरिकांनी कृत्रिम विसर्जन टँकचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.