फुलकळस रास्ता रोको

परभणीत फुलकळस येथील ग्रामस्थांचा रास्ता रोको

Fulkalas Rasta Roko Andolan: विद्यार्थ्यांना ताडकळस - शिंगणापूर रस्त्यावरून शाळेत जाताना जिव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल न घेतल्याने रास्ता रोको

परभणीत फुलकळस येथील ग्रामस्थांचा रास्ता रोको

Fulkalas Rasta Roko Andolan

 

ताडकळस -शिंगणापूर राज्य रस्त्यावर पादचारी पुलाची मागणी; प्रशासनाचे दुर्लक्ष

ताडकळस (Fulkalas Rasta Roko Andolan) : येथून जवळच असलेल्या फुलकळस येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ताडकळस - शिंगणापूर रस्त्यावरून शाळेत जाताना जिव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे. या गंभीर प्रकाराची सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल न घेतल्याने गुरुवार ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत तब्बल तीन तास ग्रामस्थांनी शाळेसमोर पादचारी पुल उभारावा या मागणीसाठी रास्ता रोको केला. अखेर सा.बां. विभागाच्या वरिष्ठ अधिकारी व तहसीलदारांनी आंदोलन स्थळी भेट देऊन लेखी आश्वासन दिल्याने हा रास्ता रोको स्थगित करण्यात आला. 

पूर्णा तालुक्यातील फुलकळस (Fulkalas Rasta Roko Andolan) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ही ताडकळस - शिंगणापूर रस्त्यावरील राज्य रस्ता क्रमांक -६१ च्या बाजुला आहे. या शाळेत इयत्ता तिसरी ते दहावी पर्यंतचे एकूण ४८१ विद्यार्थी ज्ञानार्जनासाठी येत असतात. तिसरी ते पाचवी पर्यंतचे शिक्षण घेणारे विद्यार्थी हे बाल वयातील असून रस्ता ओलांडताना त्यांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. या रस्त्यावरून ताडकळस -शिंगणापूर मार्गे पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर आदी ठिकाणी भरधाव वेगाने वाहने जात आहेत.

या रस्त्यावर शाळेच्या समोर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पादचारी पुल करावा म्हणून ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वेळोवेळी लेखी स्वरुपात मागणी केली आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने गुरुवार ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत तब्बल तीन तास ग्रामस्थांनी रस्त्यावर ठिय्या मांडला होता. या वेळी आंदोलकांनी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे तात्काळ पादचारी पुल करावी अशी मागणी केली. 

दरम्यान आंदोलन सुरु होताच दहा वाजेच्या सुमारास मंडळ अधिकारी रवी कवडे हे आंदोलनस्थळी येऊन प्रशासनाची बाजू मांडू लागले. परंतु आंदोलकांनी वरिष्ठ अधिकारी जो पर्यंत येत नाहीत तो पर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचा पवित्रा घेतला होता. या मुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलनादरम्यान नांदेड येथे जाणार्‍या रुग्णाच्या वाहणाला मात्र रास्ता मोकळा करुन देण्यात आला. आंदोलनस्थळी तीन तासानंतर पूर्णा तहसीलदार माधव बोथिकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी देशपांडे, शिंदे यांनी निवेदन स्विकारत तात्काळ पादचारी पुल करणार असल्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.

या आंदोलनाचे प्रास्ताविक मन्मथ नावकीकर यांनी केले.  या आंदोलनात सोसायटी चेअरमन डिगांबर शिराळे, विकास गव्हाळे, गजानन शिराळे, पिराजी धुळशेटे, पशुपती शिराळे, चक्रधर शिराळे, शिवकुमार शिराळे, गंगाप्रसाद गुंजकर, शिवदास शिराळे, रामा कोळेकर, हरि मिसाळ, संतोष कांबळे, नामदेव कनकटे, भागवत कोळेकर, गणेश शिराळे, शेख सत्तार आदींनी सहभाग घेतला. आंदोलनस्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी रिठे,  सपोनि श्रीधर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त होता. 

 जिल्हा परिषदेच्या बैठकीत प्रश्न मांडणार- अजित वरपूडकर  
फुलकळस (Fulkalas Rasta Roko Andolan) येथील जि.प. प्रा. शाळेसमोरील मुख्य रस्त्यावर पादचारी पुल व्हावा अशी मागणी विद्यार्थी व पालक, ग्रामस्थांतून होत आहे. परंतु या मागणीला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून केराची टोपी दाखविण्यात येत आहे. या गंभीर प्रकाराला वाचा फोडण्यासाठी शुक्रवार ९ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण बैठकीत हा प्रश्न मांडणार असून लवकरात लवकर पादचारी पुल व्हावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे लोहगाव जि.प. सर्कलचे सदस्य अजित वरपूडकर यांनी आंदोलनस्थळी मनोगत व्यक्त करताना  सांगितले. 

पालकमंत्री ना. बोर्डीकर, आ.गुट्टे यांनी साधला भ्रमणध्वनीवरून संवाद
फुलकळस (Fulkalas Rasta Roko Andolan) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोरील पादचारी पुलाचा प्रश्न गंभीर असून येणार्‍या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रामुख्याने हा प्रश्न सोडविण्यासाठी निधीची तरतूद करण्यात येणार असल्याची ग्वाही जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. मेघना बोर्डीकर यांनी आंदोलकर्त्यांशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधताना दिली. तसेच गंगाखेड विधासभा मतदार संघाचे आ. डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी देखील हा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगितले.