माजी मंत्री आ. संभाजी पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
लातूर (MLA Sambhaji Patil) : दुष्काळी परिस्थितीमुळे मजुरांच्या हाताला रोजगार आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी उसाचा वाढे उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात साखर कारखान्यांनी ऊस तोडणीसाठी हार्वेस्टरऐवजी मजुरांकरवी करावी, अशी आग्रही मागणी माजी मंत्री आमदार संभाजी पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे केली. लातूर शहरासह जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी एकत्रित येवून या संकटाचा सामना करण्यासाठी सर्वसामान्यांना दिलासा देण्याकरिता तात्कालीन व दीर्घकालीन उपाययोजना करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
आ. पाटील (MLA Sambhaji Patil) यांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन दुष्काळी परिस्थितीवर चर्चा केली. यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन ही दिले. ग्रामीण भागातील महिला बचत गट आणि महिलांवर असलेल्या स्मॉल फायनान्स व इतर कर्जांच्या सक्तीच्या परतफेडीचा मुद्दाही यावेळी प्रकर्षाने मांडत आ. पाटील यांनी या सक्तीच्या वसुलीमुळे महिला आणि त्यांची कुटुंबे मानसिक तणावात आहेत, त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून सक्तीच्या परतफेडीला स्थगिती देऊन धोरणात्मक दिलासा द्यावा, अशी मागणी केली. आ. संभाजी पाटील (MLA Sambhaji Patil) यांनी जिल्हाधिकारी डॉ. भारत बाष्टेवाड यांच्यासह विविध शासकीय विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकही घेतली.

जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढणारी टंचाई लक्षात घेता, पाण्याचं योग्य नियोजन, पाण्याची बचत, शेत तिथं काम आणि पाण्याचे नैसर्गिक व कृत्रिम स्त्रोत जिवंत ठेवणे या प्रमुख सूत्रांवर आधारित प्रशासनाने युद्धा पातळीवर काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. ग्रामीण भागातील शेतकरी आणि मजुरांचे जीवनमान टिकवून ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत अशी ठाम भूमिका या बैठकीत मांडली.
यावेळी संजय दोरवे, दगडू साळुंके, मंगेश पाटील, निलंगा नगराध्यक्ष संजय हलगरकर, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, शिरुर अनंतपाळचे पं.स. सभापती संजय सुर्यवंशी, देवणी पं.स. सभापती अंकिता पाटील, निलंगा पं.स. सभापती सुनिता वाघमारे, शिरुर अनंतपाळ तालुकाध्यक्ष माधव बिरादार, देवणी तालुकाध्यक्ष शिवराज बिरादार, देवणी कृउबा सभापती सदाशिव पाटील, शिरुर अनंतपाळ कृउबा प्र. सभापती गोविद चिलकुरे, प्रशांत पाटील जवळगेकर, जि. प. सदस्य रामलिंग शेरे, नगरसेवक संतोष शेटे, गणेश धुमाळे, आदींसह पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती होती.
पीक विम्याची रक्कम तात्काळ वितरित करा
शेतकऱ्यांना शासनाकडून थेट आर्थिक मदत तातडीने मिळावी आणि प्रलंबित असलेली पीक विम्याची रक्कम तात्काळ वितरित करण्यात यावी, अशी मागणी आ. निलंगेकर यांनी केली. याशिवाय, जिल्ह्यात पाण्याची भीषण टंचाई असल्याने पशुधन वाचवणे हे मोठे आव्हान बनले आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने विविध भागात चारा छावण्या किंवा चारा बँक सुरू करून जनावरांना मोफत चारा व पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी त्यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.