​अंचरवाडीत वन कर्मचारी

​अंचरवाडीत वन कर्मचाऱ्यांची मुजोरी व वसुली: १.७५ लाखांच्या फसवणुकीसह २९ शेतकऱ्यांवरही लादली बेकायदेशीर चराई वसुली!

Forest staff in Ancharwadi: अंचरवाडी (ता. चिखली) परिसरात वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सुरू असलेली दडपशाही, आर्थिक शोषण आणि अवैध वसुलीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे...

​अंचरवाडीत वन कर्मचाऱ्यांची मुजोरी व वसुली: १.७५ लाखांच्या फसवणुकीसह २९ शेतकऱ्यांवरही लादली बेकायदेशीर चराई वसुली!

Forest staff in Ancharwadi

 

​राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) जिल्हा कार्याध्यक्ष शंतनु बोंद्रे यांच्या नेतृत्वात निवेदन सादर
​मागण्या मान्य न झाल्यास १६ ऑक्टोबरपासून अन्नत्याग आंदोलनाचा इशारा

चिखली (Forest staff in Ancharwadi) : अंचरवाडी (ता. चिखली) परिसरात वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सुरू असलेली दडपशाही, आर्थिक शोषण आणि अवैध वसुलीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वनरक्षक गजानन पोटे व वनमजूर ऋषिकेश तुपकर यांनी संगनमत करून एका शेतकऱ्याची १ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केल्याच्या तक्रारीसह, गावातील तब्बल २९ शेतकऱ्यांकडून चराई पास न देता प्रति जनावर बेकायदेशीर पैसे उकळल्याची तक्रार वन विभागाकडे दाखल करण्यात आली आहे.

​राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) जिल्हा कार्याध्यक्ष शंतनु बोंद्रे, तालुका अध्यक्ष संतोष परिहार यांच्या प्रमुख उपस्थितीत गावातील ग्रामस्थ आणि पीडित शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत बुलढाणा विभागीय वन अधिकारी (DFO) कार्यालयावर धडक देऊन हे निवेदन सादर केले.

​१ लाख ७५ हजारांचा गंडा
​तक्रारदार शेतकरी सागर गजानन परिहार (रा. अंचरवाडी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची गट क्र. २४६, २४७, २४८ मधील मालकीची शेतजमीन वन विभागाच्या हद्दीला लागून आहे. १ सप्टेंबर २०२६ रोजी वनरक्षक गजानन पोटे आणि वनमजूर ऋषिकेश तुपकर यांनी शेतात येऊन, "तुझा गोठा व शेतीची वाहने वन विभागाच्या जमिनीवर आहेत, तुझ्यावर कारवाई करू व वाहने जप्त करू," अशी धमकी दिली. या मानसिक दबावाखाली सागर परिहार यांच्याकडून १ लाख ७५ हजार रुपये वनमजूर ऋषिकेश तुपकर याच्या घरी नेऊन घेण्यात आले. मात्र, नंतर शेतजमिनीची खाजगी मोजणी केली असता ती जमीन परिहार यांच्याच मालकीची असल्याचे स्पष्ट झाले.

​२९ शेतकऱ्यांची चराईच्या नावाखाली लूट!
​याच प्रकरणासोबतच अंचरवाडी गावातील तब्बल २९ शेतकऱ्यांनी वनरक्षक पोटे आणि वनमजूर तुपकर यांच्याविरोधात स्वतंत्र तक्रारी दाखल केल्या आहेत. ​तक्रारदार शेतकरी सुशील तुकाराम खिलारे व इतर शेतकऱ्यांनी दिलेल्या अर्जानुसार, वनक्षेत्राला लागून असलेल्या भागात गुरे-ढोरे आणि शेळ्या-मेंढ्या चारत असताना वनरक्षक पोटे व वनमजूर तुपकर हे सतत धमक्या देत असत. "पैसे दिले नाही तर गुरे-ढोरे जप्त करू व कायदेशीर कारवाई करू," अशी भीती दाखवून त्यांनी:

​प्रति बैल: ₹२००
प्रति शेळी/बकरी: ₹ १००

​याप्रमाणे हजार ते १५०० रुपयांपर्यंतची अवैध वसुली केली. विशेष म्हणजे, कोणतीही पावती किंवा अधिकृत चराई पास न देता ही वसुली करण्यात आली असून सर्व पैसे वनमजूर ऋषिकेश तुपकर याच्याकडे जमा करण्यास भाग पाडले गेले.

​१६ ऑक्टोबरपासून 'अन्नत्याग आंदोलनाचा' इशारा!
​आधीच दुष्काळी परिस्थिती आणि निसर्गाच्या कोपाने खचलेल्या शेतकऱ्यांची अशा प्रकारे शासकीय कर्मचाऱ्यांकडून होणारी लूट अत्यंत गंभीर आहे. याप्रकरणी वनरक्षक गजानन पोटे आणि वनमजूर ऋषिकेश तुपकर यांच्यावर तातडीने कठोर विभागीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा १६ ऑक्टोबर २०२६ पासून DFO कार्यालयासमोर सर्व शेतकऱ्यांसह अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. ​या निवेदनाच्या प्रती वनमंत्री (महाराष्ट्र राज्य), जिल्हाधिकारी (बुलढाणा), पोलीस अधीक्षक (बुलढाणा) आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) यांच्याकडेही आवश्यक कारवाईसाठी सादर करण्यात आल्या आहेत.