१३ लाखाचा हळद पावडर साठा जप्त नियमातील तरतुदींचे उल्लंघन आढळले...!
परभणी (Food Administration Raids) : सुरक्षित अन्न निरोगी महाराष्ट्र मोहिमेंतर्गत सणासुदीच्या काळात परभणी जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने छापेमारी करण्यात आली आहे. सेलू, परभणी शहर या ठिकाणी छापे टाकून साठा जप्त करण्यात आला आहे. सदर ठिकाणी अन्न सुरक्षा व मानदे नियमांमधील विविध तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले.
सेलू - वालूर रोड मु.पो. ब्राम्हणगाव ता. सेलू या ठिकाणी मे. अभिनव फुट प्रोडक्ट पेढी मधील खाद्य रंग आणि अनारोग्यकारक हाताळणी व अयोग्यरित्या पॅकिंग करीत असल्याचे आढळल्याने १३ लाख ४ हजार ४०० रुपये किंमतीचा ४ हजार ३४८ किलो वजनाचा हळद पावडर साठा जप्त करण्यात आला. सदर पेढीचा परवाना तत्काळ प्रभावाने निलंबीत करण्यात आला आहे.
जप्त करण्यात आलेल्या अन्न पदार्थाचे अधिकृत नमुने घेऊन ते तपासणीसाठी अन्न विश्लेषण प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्याच प्रमाणे परभणी शहरातील रहेमत नगर भागात मे. के.के. बेकर्स या पेढीचीही तपासणी करण्यात आली. सदर आस्थापनेने परवाना अद्ययावत केला नाही, अन्न हाताळणारे व्यक्ती, कामगारांनी अॅप्रॉन, हेडगियर घातले नव्हते, वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव होता. सुरक्षित अन्न पदार्थ तयार करण्यासाठी अपुरी व्यवस्था होती. या व इतर कारणामुळे या पेढीचा परवाना तत्काळ निलंबीत करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्य आयुक्त अनंत चौधरी, अन्न सुरक्षा अधिकारी ठोंबरे, मुळे यांच्या पथकाने केली.