बंडगार्डन रस्त्यावरील हॉटेलमध्ये पोलिसांची कारवाई; बनावट ग्राहकाच्या मदतीने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचा छापा
पुणे : शहरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये परराज्यांतील तरुणींना आणून कथितरीत्या देहव्यवसाय चालवला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संगमवाडी-बंडगार्डन रस्त्यावरील एक्साइज कॉलनीजवळ असलेल्या एका नामांकित हॉटेलमध्ये पुणे पोलिसांनी छापा टाकून दोन तरुणींची सुटका केली. या प्रकरणी आसाममधील तिघांसह एकूण चार जणांविरुद्ध कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बनावट ग्राहकाच्या मदतीने पोलिसांची कारवाई
संबंधित पंचतारांकित हॉटेलमध्ये एजंटांच्या माध्यमातून परराज्यांतील तरुणींना आणले जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक (HTU) कक्षाच्या पोलीस निरीक्षक आशालता खापरे यांच्या पथकाने नियोजन केले.
पोलिसांनी प्रथम एका बनावट ग्राहकाला हॉटेलमध्ये पाठवले. त्याच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीची पडताळणी केल्यानंतर पथकाने संबंधित खोलीवर अचानक छापा टाकला. या कारवाईत कथित देहव्यवसायाचा प्रकार समोर आला.
मॉडेलिंग क्षेत्रातील दोन तरुणींची सुटका
छाप्यादरम्यान पोलिसांनी परराज्यातून आणलेल्या दोन तरुणींची सुटका केली. या दोघी मॉडेलिंग क्षेत्राशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, पैशांचे आमिष दाखवून किंवा त्यांच्या अडचणींचा फायदा घेऊन त्यांना या व्यवसायात ढकलण्यात आल्याचा संशय आहे. या बाबींचा तपास पोलीस करत आहेत.
आसाममधील तिघांसह चौघांविरुद्ध गुन्हा
या प्रकरणात रोहन उर्फ राजकुमार (वय ३२), विवेक उर्फ मयंक कबीर (वय ३४) आणि विक्रम उर्फ पीयुष (वय ३४), हे तिघेही आसामचे रहिवासी असून, त्यांच्यासह आणखी एका साथीदाराविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या चौघांविरोधात कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली आहे.
पंचतारांकित हॉटेलमध्ये हा प्रकार उघडकीस आल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे. या कथित रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच तरुणींना हॉटेलपर्यंत आणण्यामागे कोणते एजंट कार्यरत होते, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.