रविवार सकाळपासून तीन बंबाने पाण्याचा मारा तरी आग अटोक्यात येईना
परभणी (Parbhani garbage depot Fire) : गंगाखेड रोडवरील बोरवंड येथे असलेल्या महापालिकेच्या कचरा डेपोला रविवार २५ ऑक्टोबर रोजी सकाळी सहाच्या सुमारास आग लागली. अग्निशमन विभागाचे कर्मचारी तीन बंबाच्या सहाय्याने आग विझविण्यासाठी पाण्याचा मारा करत आहेत. दुपारी चार वाजेपर्यंतही आग अटोक्यात आली नव्हती.
परभणी शहरातून संकलीत होणारा कचरा घंटागाड्यांच्या माध्यमातून बोरवंड येथील कचरा संकलन केंद्रावर नेऊन टाकला जातो. या ठिकाणी कचर्याचा डोंगर झाला आहे. रविवारी सकाळच्या सुमारास अचानक कचर्याला आग लागली. बघता बघता आगीचे क्षेत्र वाढले. मोठ्या प्रमाणात धुराचे लोळ निघू लागले. आगीची माहिती परभणी महापालिका अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमनचे अधिकारी, फायरमन यांनी तीन बंब घेऊन घटनास्थळी धाव घेतली.
आग विझविण्यासाठी सलग पाण्याचा मारा करण्यात येत आहे. मात्र विझली नाही. बोरवंड येथून खाजा कॉलनी येथील जलकुंभावर पाणी भरण्यासाठी यावे लागत आहे. वाहतुकीचा वेळ वाढल्याने विझविण्याच्या प्रयत्नात अडथळा निर्माण होत आहे. दरम्यान या अगोदर देखील सदर ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत.