निकषाचे पालन केले नसल्याने एफडीएने केली कारवाई
हिंगोली/ कुरूंदा (Vasmat FDA Raids) : अन्न सुरक्षा कायद्यातंर्गत निकषाचे पालन केले जात नसल्याने अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने वसमत तालुक्यात दोन ठिकाणी हळद प्रक्रीया उद्योगावर छापे मारून जवळपास १ कोटी रुपयाची हळद पावडर जप्त केली.
याबाबत अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने दिलेली माहिती अशी की, सध्या सन व उत्सव कालावधीत मसाल्याचा अधिक वापर होत असल्याने त्याची तपासणी करून कारवाई करण्याच्या सूचना अन्न व औषध प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे, सह आयुक्त श्रीकांत करकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी मोहीम सुरू आहे.
वसमत तालुक्यात सोमठाणा रोड परिसरात अन्न औषध प्रशासन विभागाच्या पथकाने मे. वसमत अॅग्रो व्हेंचर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (हळद प्रक्रिया उद्योग) आस्थापनेत तपासणी केली. या आस्थापनेत अस्वच्छता व नियमांचे उल्लंघन आढळून आल्यामुळे ४३ लाख ८२ हजार ५० रुपयांची हळद जप्त करण्यात आली. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील कुरुंदा परिसरातील सोमठाणा येथे मे. वसमत अॅग्रो व्हेंचर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (हळद प्रक्रिया उद्योग) या आस्थापनेवर अन्न औषध प्रशासन विभागाच्या पथकाने गुरुवारी धाड टाकून पाहणी केली असता या ठिकाणी अत्यंत अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन करण्याचे आढळून आले.
अन्न सुरक्षा अधिकारी असलेले तुषार घोपे यांनी अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ च्या कलमानुसार ४३ लाख ८२ हजार ५० रुपये किमतीच्या हळदीच्या ४८७ गोण्यांतून हळद जप्त केली. अन्न सुरक्षा विभागाच्या नियमावलीनुसार केलेल्या ऑटो-जनरेटेड तपासणीत या हळद प्रक्रिया उद्योगाला ६७ पैकी केवळ २४ गुण म्हणजे ३२ टक्के मिळाल्यामुळे या उद्योगाकडून नियमांचे पालन होत नसल्याचे आढळून आले.
हा (Vasmat FDA Raids) साठा सील करून पुढील आदेश येईपर्यंत हळदीचा साठा हलवण्यास किंवा त्यांची विक्री करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. या प्रकरणी अन्न औषध प्रशासन विभागाच्या पथकाकडून पुढील कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले. या भागामध्ये इतरही ठिकाणी मोठ्या प्रमाणात हळदीवर प्रक्रिया करण्याची प्रकार होत असून त्यांचे वेळोवेळी तपासणी होणे गरजेचे आहे. हळद प्रक्रियेतून पावडर निर्माण करण्याचे प्रकार या भागात पाहण्यास मिळते,हळदीचे होणारे पावडर तपासणे अत्यंत गरजेचे आहे.
त्याच प्रमाणे वसमत शहराजवळील माळवटा भागामध्ये २३ ऑक्टोंबर शुक्रवार रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने गणराज इंडस्ट्रीज या कंपनीमध्ये तपासणी केली असता सदर ठिकाणी अस्वच्छता व अन्न सुरक्षा कायद्यातंर्गत निकषाचे पालन केले जात नसल्याने ६० लाख रुपयाची हळद पावडर जप्त करण्यात आली. त्याच प्रमाणे या कंपनीचा परवाना निलंबित करण्याची प्रक्रीया देखील सुरू झाली असल्याची सुत्रांनी सांगितले. वसमत तालुक्यातील दोन ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाची ही पहिलीच मोठी कारवाई मानली जात आहे.