धरणग्रस्त शेतकरी आमरण उपोषण

पेनटाकळीच्या पाण्याचे नियोजन जाहीर करा; शेतकऱ्यांवरील दडपशाही सहन करणार नाही!

Farmers Hunger Strike: पेनटाकळी प्रकल्पातील पाणीवाटपाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, उपसा सिंचन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वीजजोडण्या तोडण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाविरोधात धरणग्रस्त शेतकरी..

पेनटाकळीच्या पाण्याचे नियोजन जाहीर करा; शेतकऱ्यांवरील दडपशाही सहन करणार नाही!

Farmers Hunger Strike

 

धरणग्रस्त शेतकऱ्यांचे पेनसावंगीत आमरण उपोषण; वीजजोडण्या पूर्ववत करण्यासह पाच प्रमुख मागण्या

चिखली (Farmers Hunger Strike) : पेनटाकळी प्रकल्पातील पाणीवाटपाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, उपसा सिंचन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वीजजोडण्या तोडण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाविरोधात धरणग्रस्त शेतकऱ्यांनी पेनसावंगी येथे पैनगंगा नदीकाठावर आमरण उपोषण सुरू केले आहे. पाण्याचे पारदर्शक व समन्यायी नियोजन जाहीर करा, शेतकऱ्यांच्या वीजजोडण्या पूर्ववत करा आणि उभ्या पिकांना सिंचनासाठी पाणी उपसा करण्याची परवानगी द्या, अशा ठाम मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत. "आमचा पाणी सोडण्याला विरोध नाही; मात्र पाण्याचे नियोजन जाहीर केल्याशिवाय शेतकऱ्यांवर एकतर्फी निर्णय लादू नका. शेतकऱ्यांवरील दडपशाही सहन केली जाणार नाही," असा इशारा महाराष्ट्र वारकरी संप्रदायाचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश बुवा जवंजाळ यांनी दिला.

पेनटाकळी प्रकल्पासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या सुपीक जमिनी अल्प मोबदल्यात शासनाला दिल्या. मात्र आज त्याच प्रकल्पाच्या पाण्यासाठी धरणग्रस्त शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची वेळ आली आहे, ही दुर्दैवी बाब असल्याची भावना उपोषणस्थळी व्यक्त करण्यात आली. आधीच अपुऱ्या पावसामुळे हळद, तूर आणि अन्य उभ्या पिकांना पाण्याची गरज असताना वीजजोडण्या तोडण्याच्या आदेशामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

पाण्याचा हिशोब द्या, मगच निर्णय घ्या!
उपोषणस्थळी प्रकाश बुवा जवंजाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष शंतनु बोंद्रे, कृषी उत्पन्न बाजार समिती चिखलीचे सभापती समाधान सुपेकर, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक, शेतकरी संघटनेचे देविदास कणखर व समाधान कणखर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष परीहार आदींनी प्रशासनाच्या पाणीवाटप धोरणावर तीव्र प्रश्न उपस्थित केले.

यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, चिखली शहर, परिसरातील गावे आणि खालच्या भागातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळालेच पाहिजे. त्यासाठी आवश्यक पाणीसाठा आरक्षित ठेवण्यास शेतकऱ्यांचा कोणताही विरोध नाही. मात्र पिण्याच्या पाण्यासाठी किती टीएमसी पाणी राखीव ठेवणार, बाष्पीभवनासाठी किती पाणी गृहीत धरणार, खालच्या भागात किती पाणी सोडणार आणि धरणग्रस्त शेतकऱ्यांना सिंचनासाठी किती पाणी मिळणार, याचा संपूर्ण हिशोब प्रशासनाने जाहीर करावा. केवळ आदेश काढून किंवा शेतकऱ्यांच्या वीजजोडण्या तोडून हा प्रश्न सुटणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.

यापूर्वी दोन वेळा प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले. त्यावेळी स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेण्यात आले नसल्याचा आरोपही करण्यात आला. पहिल्यांदा पाणी सोडण्याची आवश्यकता नसतानाही कोणाच्या दबावाखाली निर्णय घेण्यात आला, असा सवाल उपस्थित करत आता पुन्हा पाणी सोडण्याची घाई का केली जात आहे, याचे उत्तर प्रशासनाने द्यावे, अशी मागणी करण्यात आली.

आमदार श्वेताताई महाले यांच्या भूमिकेचे समर्थन
पेनटाकळी प्रकल्पावरील पाणीवाटपाच्या प्रश्नावर आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी ३१ ऑक्टोबर रोजी घेतलेल्या आढावा बैठकीतील भूमिकेचे उपोषणस्थळी उपस्थित शेतकरी प्रतिनिधींनी समर्थन केले. प्रकल्पात सध्या ७२ टक्के पाणीसाठा असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली होती. मात्र उपलब्ध पाण्याच्या हिशोबात सुमारे दहा टक्क्यांचा ताळमेळ लागत नसल्याचा मुद्दा आमदारांनी उपस्थित केला होता.

पिण्याच्या पाण्याचे आरक्षण, बाष्पीभवन, खालच्या भागातील पाणीवाटप आणि वरच्या भागातील शेतकऱ्यांची सिंचनाची गरज या सर्वांचा विचार करूनच निर्णय घेण्यात यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली होती. भविष्यात पाऊस न झाल्यास पिण्याच्या पाण्याचे आरक्षण धोक्यात येऊ नये, यासाठी उपलब्ध साठ्याचा अचूक हिशोब आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.

आमदारांनी पाणी सोडण्यास विरोध केलेला नसून, पाण्याचे नियोजन स्पष्ट करा आणि दोन्ही भागांतील शेतकऱ्यांना समान न्याय द्या, एवढीच त्यांची भूमिका असल्याचे सांगत उपोषणस्थळी उपस्थितांनी त्यांच्या निर्णयाचे समर्थन केले. काही राजकीय मंडळींकडून त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून एकतर्फी क्लिप प्रसारित करण्यात आल्याची टीकाही यावेळी करण्यात आली.

धरणग्रस्तांच्या त्यागाची जाणीव ठेवा!
पेनटाकळी प्रकल्पासाठी अनेक शेतकऱ्यांनी एकरी अवघ्या ४० हजार रुपयांच्या मोबदल्यात जमिनी दिल्या. आज त्याच जमिनींचे मूल्य एकरी ४० लाख रुपयांपर्यंत पोहोचले आहे. काही शेतकरी शंभर टक्के भूमिहीन झाले, तर अनेकांनी आपल्या कुटुंबाच्या भविष्याचा विचार करून प्रकल्पासाठी जमिनींचा त्याग केला. मात्र धरणासाठी जमीन देऊनही उर्वरित शेतीतील पिकांना पाणी मिळत नसेल, तर या त्यागाचा उपयोग काय, असा संतप्त सवाल करण्यात आला.

यावेळी माजी मंत्री भारत भाऊ बोंद्रे यांनी उभारलेल्या पेनटाकळी प्रकल्पाच्या कार्याचेही शेतकरी प्रतिनिधींनी कौतुक केले. त्यांच्या दूरदृष्टीतून निर्माण झालेल्या प्रकल्पामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला; मात्र आज त्याच प्रकल्पातील पाण्यावरून धरणग्रस्तांना संघर्ष करावा लागत आहे, ही बाब खेदजनक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

बोंद्रे आणि तुपकर यांचे भ्रमणध्वनीवरून समर्थन
पेनसावंगी येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाला माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी भ्रमणध्वनीवरून समर्थन दर्शविले. यामुळे आंदोलनाला राजकीय आणि शेतकरी संघटनांचा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे.

पाच प्रमुख मागण्यांवर शेतकरी ठाम
उपोषणकर्त्यांनी प्रशासनासमोर पाच प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. यामध्ये चिखली शहरासह परिसरातील गावांसाठी प्रथम पिण्याच्या पाण्याचे आरक्षण निश्चित करावे, त्यानंतर शिल्लक पाणीसाठ्यातून समप्रमाणात सिंचनासाठी पाणी उपसा करण्याची परवानगी द्यावी, तोडण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या वीजजोडण्या तातडीने पूर्ववत कराव्यात, भविष्यात प्रकल्पातून पाणी सोडण्यापूर्वी प्रतिनिधिक शेतकरी उपस्थित असावेत आणि शासन व जिल्हा प्रशासनाने तातडीने बैठक घेऊन धरणग्रस्त शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न निकाली काढावा, या मागण्यांचा समावेश आहे.

उभ्या पिकांना स्प्रिंकलर आणि ठिबक सिंचनाद्वारे पाणी देण्याची परवानगी मिळावी, यावरही शेतकरी ठाम आहेत. हळद, तूर आणि इतर पिकांवर मोठा खर्च झालेला असताना केवळ चारा पिकांची लागवड करा, असे सांगून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. जनावरांसाठी चारा उपलब्ध नसल्याने पशुधन जगविण्याचेही संकट निर्माण झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.

तहसीलदारांना उपोषणस्थळावरून परतावे लागले
सायंकाळी उशिरा तहसीलदार विजय सवडे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र, पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पाणीवाटप समितीच्या बैठकीत ठोस निर्णय झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका शेतकरी प्रतिनिधींनी घेतली. त्यामुळे तहसीलदारांना निर्णयाविना परतावे लागले. आंदोलनस्थळी अमडापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार जयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

या आंदोलनाला माजी सभापती सुधाकर धमक, अशोकराव पडघान, विजय शेजोळ, समाधान आकाळ, गणेशराव जवंजाळ, रामभाऊ भुसारी, समाधान गीते, शेषराव पाटील, समाधान देशमुख, समाधान वायाळ, प्रदीप शेजुळ, सरपंच धावडे, काळे, सोनटक, विठ्ठल शिंदे आदींनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. पेनटाकळी प्रकल्पासाठी जमिनी दिलेल्या वरखेड, मंगरूळ नवघरे, घानमोड, मानमोड, डोंगरगाव, नायगाव खुर्द, नायगाव बुद्रुक, पेनसावंगी, भोरसा-भोरसी, पांढरदेव आदी गावांतील शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

"आम्ही प्रकल्पासाठी जमिनी दिल्या, त्याग केला; आता आमच्या उभ्या पिकांना पाणी मागण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागत असेल, तर यापेक्षा दुर्दैव काय? आमच्या पाचही मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण मागे घेतले जाणार नाही," असा निर्धार शेतकरी प्रतिनिधींनी व्यक्त केला. त्यामुळे ४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पाणीवाटप समितीच्या बैठकीकडे संपूर्ण चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

बंजारा समाजाचा एसटी आरक्षणासाठी पोहरादेवी येथे बेमुदत उपोषण!

बंजारा समाजाचा एसटी आरक्षणासाठी पोहरादेवी येथे बेमुदत उपोषण!

पोहरादेवी येथे बंजारा समाजाचे एसटी आरक्षणासाठी बेमुदत उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू; समितीचा प्रगती अहवाल जाहीर करण्यासह विविध मागण्या.

Sep 15, 2026
मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा; पुयना येथे युवकाचे पाण्याच्या टाकीवर बेमुदत आंदोलन

मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा; पुयना येथे युवकाचे पाण्याच्या टाकीवर बेमुदत आंदोलन

मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कळमनुरी तालुक्यातील पुयना येथील लक्ष्मण टवले यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन सुरू केले आहे.

Sep 05, 2026
मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ आखाडा बाळापूर कडकडीत बंद 

मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ आखाडा बाळापूर कडकडीत बंद 

Manoj Jarange Patil: मराठा समाजाच्या आरक्षणाचा मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे या आंदोलनात राज्याभरातून मराठा समाज सहभागी

Sep 03, 2026