तरुण शेतकर्याची आत्महत्या; मानवत तालुक्यातील सोमठाणा येथील घटना
मानवत (Parbhani Farmer suicides) : शेतीसाठी वडिलांनी घेतलेले कर्ज कसे फेडावे, पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी झालेला खर्च आणि पावसामुळे शेतीवरील खर्च कसे निघेल, या विवंचनेत एका तरुण शेतकर्यांनी विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. ही घटना मंगळवार १३ ऑक्टोबर रोजी मानवत तालुक्यातील सोमठाणा येथे उघडकीस आली.
गोविंद बापुराव निर्वळ यांनी खबर दिली आहे. त्यांच्या चुलत भावाचा मुलगा राहुल विठ्ठलराव निर्वळ हा शेती करत होता. तीन महिन्यापूर्वी संबंधिताच्या पत्नीचे ऑपरेशन झाले होते. तसेच वडिलांनी शेतीसाठी बँकेकडून कर्ज घेतले होते. त्यामुळे राहुल निर्वळ हा चिंतेत राहत होता. १३ ऑक्टोबर रोजी सकाळी चारच्या सुमारास राहुल निर्वळ शेताकडे जावून येतो, असे म्हणत घरातून बाहेर पडला. बराच वेळ झाल्याने संबंधित घरी परत आला नाही. त्यामुळे राहुलच्या वडिलांनी खबर देणार गोविंद निर्वळ यांना फोनवरुन माहिती दिली.
त्यानंतर राहुलचा शोध घेण्यात आला. सायंकाळी साडे पाचच्या सुमारास गावातील शेत शेजारी मधुकर वाघ यांच्या शेतातील विहिरीच्या बाजूला राहुलची चप्पल दिसून आली. विहिरीत डोकावून पाहिले असता राहुल निर्वळ हा पाण्यात तरंगताना दिसून आला. घटनेची माहिती मानवत पोलिसांना देण्यात आली. या (Parbhani Farmer suicides) प्रकरणी नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.