त्रासाला कंटाळून हंडरगुळी येथील रामदास शिवाजी बोळेगावे या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
हंडरगुळीतील प्रकार; आरोपीला अटक करण्याच्या आश्वासनानंतर मृतदेह खाली उतरवला
वाढवणा बु. : घर बांधणीसाठी घेतलेले पैसे परत कर, असे म्हणत खाजगी सावकारांकडून सतत शिवीगाळ, धमकी आणि होणाऱ्या त्रासाला कंटाळून हंडरगुळी येथील रामदास शिवाजी बोळेगावे या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी (दि. २७) सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली.
घटनेनंतर नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. ‘जोपर्यंत आरोपीला अटक करत नाहीत, तोपर्यंत मृतदेह खाली उतरवू देणार नाही,’ अशी संतप्त भूमिका नातेवाईकांनी घेतली. उदगीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांनी आरोपीला तात्काळ अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह खाली उतरवून हंडरगुळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
घर बांधकामासाठी घेतले होते व्याजी पैसे
याबाबत अधिक माहिती अशी की, हंडरगुळी येथील रामदास शिवाजी भोळे (वय ४५, व्यवसाय शेती व पिग्मी एजंट) यांनी घर बांधकामासाठी विक्रम उर्फ जंटू राजपाल माने व जीवन चंद्रकांत माने यांच्याकडून व्याजी पैसे घेतले होते. यातील काही रक्कम त्यांनी टप्प्याटप्प्याने खाजगी सावकारांना परत केली होती. मात्र, उर्वरित रकमेसाठी त्यांना वारंवार त्रास दिला जात असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
अखेर या त्रासाला कंटाळून रामदास बोळेगावे यांनी मोरतळवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या आपल्या भावाच्या शेतात गुरुवारी (दि. २७) सकाळी साडेसहाच्या सुमारास आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
याबाबत मयताचा भाऊ विलास शिवाजी बोळेगावे यांनी वाढवणा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वाढवणा पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 264/26, कलम 108, 351(2), 351(3), 352, 3(5) भादंविनुसार विक्रम उर्फ जंटू राजपाल माने, जीवन चंद्रकांत माने आणि चंद्रकांत माने (तिघेही रा. हाळी, ता. उदगीर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड हे करत आहेत.
१९ मे रोजीही आत्महत्येचा प्रयत्न?
दरम्यान, यापूर्वीही म्हणजेच १९ मे रोजी रामदास शिवाजी बोळेगावे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता, अशी चर्चा हंडरगुळी ग्रामस्थांमध्ये होत आहे. विषारी औषध प्राशन करून त्यांनी जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती ग्रामस्थांमध्ये चर्चिली जात आहे.
डीवायएसपींनी दिले आरोपीला अटक करण्याचे आश्वासन
जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह खाली उतरू देणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली होती. त्यानंतर उदगीरचे डीवायएसपी अरविंद रायबोले घटनास्थळी हजर झाले. त्यांनी आरोपीला पकडण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी हंडरगुळी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला.