कर्जमाफीच्या चार याद्या जाहीर, नियमित कर्जफेड करणारे वाऱ्यावर
मानोरा (Farmer Crop Loan) : पीककर्ज थकीत झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा देण्यासाठी शासनाने आतापर्यंत चार याद्या जाहीर केल्या. मात्र, नियमितपणे पीककर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर निधी देण्याची घोषणा होऊन वर्ष उलटले, तरी अद्याप एकाही पात्र शेतकऱ्याच्या बँक खात्यात ही रक्कम जमा झालेली नसल्याने या शेतकऱ्यांची दिवाळीही गोड कशी होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
एकिकडे जिल्ह्यातील सहा तालुके दुष्काळग्रस्त घोषित झाल्याने शेतकरी संकटाशी झुंजत आहेत, तर दुसरीकडे हक्काच्या प्रोत्साहन निधीसाठी त्यांना प्रतीक्षाच करावी लागत आहे. दिवाळीसारखा महत्त्वाचा सण तोंडावर असताना शासनाच्या घोषणेचे प्रत्यक्ष लाभात रूपांतर कधी होणार, असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत. पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनी आर्थिक शिस्त पाळत हाडाची काडे आणि रक्ताचे पाणी करून बँकांचे हप्ते भरले. कर्ज थकीत होऊ नये, यासाठी अनेकांनी आपल्या गरजा बाजूला ठेवून कर्जाची परतफेड केली. अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ५० हजार रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मात्र, घोषणा होऊन वर्ष उलटूनही प्रत्यक्ष निधी वितरणाबाबत ठोस प्रगती दिसत नसल्याने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये शासनाप्रती नाराजीचा सूर आहे.
कर्जमाफीच्या (Farmer Crop Loan) पात्र शेतकऱ्यांसाठी याद्या जाहीर होत असताना नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रोत्साहन निधीचे घोडे नेमके कुठे अडले आहे, हा प्रश्न अनुत्तरित आहे. घोषणा करताना दाखवलेली तत्परता निधी वितरणाच्या वेळी का दिसत नाही? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. पावसाचा अनियमितपणा त्यातच पिकांवर झालेला किडींचा प्रादुर्भाव यामुळे मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना यंदा दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. शेतीतील अनिश्चितता, उत्पादन खर्च आणि रोजच्या गरजांचा ताळमेळ साधताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. अशा परिस्थितीत ५० हजार रुपयांचा प्रोत्साहन निधी मिळाल्यास सणासुदीच्या काळात काही प्रमाणात आर्थिक आधार मिळू शकतो. त्यामुळे 'आज मिळेल, उद्या मिळेल' या आशेवर शेतकरी शासनाच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले आहेत.
दिवाळी हा आनंदाचा आणि कुटुंबासोबत सण साजरा करण्याचा काळ. मात्र, शेतीवर अवलंबून असलेल्या अनेक कुटुंबांसाठी आर्थिक अडचणीमुळे हा आनंदही चिंतेत बदलण्याची शक्यता आहे. शासनाने जाहीर केलेली मदत वेळेत मिळाली असती, तर शेतकऱ्यांना किमान सणाच्या खर्चासाठी हातभार लागला असता. आता दिवाळीपूर्वी तरी ही रक्कम खात्यात जमा होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शासनाने दिवाळीपूर्वी निधी जमा करण्याबाबत ठोस निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.
नियमित कर्जफेड (Farmer Crop Loan) करून बँकांचा विश्वास टिकवणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या घोषणेवर विश्वास ठेवून वर्षभर वाट पाहावी लागणे, ही चिंतेची बाब आहे. दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन निधी हा केवळ आर्थिक मदत नसून त्यांच्या कष्टांची दखल घेणारा निर्णय आहे. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर पुन्हा आश्वासनांची फटाकेफोड करण्याऐवजी प्रत्यक्ष निधी वितरणाची टिंगी पेटविण्याची वेळ आली आहे. शासनाने आता तारीख जाहीर करावी आणि पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ५० हजार रुपये जमा करून घोषणेची पूर्तता करावी, अशी माफक अपेक्षा येथील बळीराजा बाळगून आहे.