सेनगाव नगरपंचायतमध्ये ही स्थापत्य अभियंत्याचा अतिरिक्त पदभार
हिंगोली (Engineer Pratik Naik) : वाशीम नगरपरिषदेचे स्थापत्य अभियंता प्रतीक प्रकाश नाईक यांच्याकडे आता हिंगोली जिल्ह्यातील दोन नगरपालिकांचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे ते आता वाशिम आणि हिंगोली या दोन जिल्ह्याचे नगर अभियंता बनले आहेत.
नगरपरिषद प्रशासन संचालनालय, नवी मुंबई यांच्याकडून दि. ४ नोव्हेंबर २०२६ रोजी याबाबतचा आदेश काढण्यात आला आहे. लोकप्रतिनिधी यांची मागणी तसेच हिंगोली नगरपरिषद व सेनगाव नगर पंचायत येथील पद रिक्ततेमुळे निर्माण होत असलेली प्रशासकीय निकड विचारात घेऊन हा आदेश काढण्यात आला आहे. हा आदेश सह आयुक्त रोहिदास दोरकुळकर यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आला आहे.
आदेशानुसार प्रतीक प्रकाश नाईक, स्थापत्य अभियंता, श्रेणी ब, वाशीम नगरपरिषद, जि. वाशीम यांना पुढील आदेशापर्यंत प्रत्येक आठवड्यातील बुधवार व गुरुवार हिंगोली नगरपरिषद, जि. हिंगोली येथील तसेच शुक्रवारी सेनगाव नगरपंचायत, जि. हिंगोली येथील रिक्त स्थापत्य अभियंता पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.
नगर अभियंता नाईक (Engineer Pratik Naik) यांनी आपल्या मूळपदाचा कार्यभार सांभाळून अतिरिक्त पदभार ग्रहण करून तसा अनुपालन अहवाल संचालनालयास तात्काळ सादर करावा, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे नगर अभियंता प्रतीक नाईक यांनी हिंगोली नगरपालिकेत कर्तव्य बजावताना शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेसह जलेश्वर तलावातील सुशोभीकरण रस्ते विकासाची कामे यासह अन्य विकासाच्या कामाकडे प्रामुख्याने लक्ष घालून शहर विकासाला मोठा हातभार लावला होता.