Parbhani Mahavitaran fire: शहरातील जिंतूर रोडवरील महावितरण कार्यालय परिसरातील दर्गा रोड सब-स्टेशनच्या १० मेगा होल्टएंपियर क्षमतेचा पावर ट्रांसफार्मर तांत्रिक बिघाडामुळे निकामी झाल्याने भीषण आग..
दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु; सहकार्य करण्याचे अधीक्षक अभियंत्यांचे आवाहन
परभणी (Parbhani Mahavitaran fire) : शहरातील जिंतूर रोडवरील महावितरण कार्यालय परिसरातील दर्गा रोड सब-स्टेशनच्या १० मेगा होल्टएंपियर क्षमतेचा पावर ट्रांसफार्मर तांत्रिक बिघाडामुळे निकामी झाल्याने यास शुक्रवारी सकाळी अचानक भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिस बंदोबस्त अवघ्या १० ते १५ मिनिटांत घटनास्थळी दाखल झाला. शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयाची रुग्णवाहिकाही घटनास्थळी तैनात करण्यात आली होती तसेच जिंतूर रोड ते दर्गा रोड जाणारा मुख्य रस्ता काही काळ वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता.
या (Parbhani Mahavitaran fire) दुर्घटनेत दर्गा रोड परिसराला वीजपुरवठा करणारा फिडर जळून खाक झाल्याने दर्गा रोड परिसर तसेच जुना पेडगाव रोड परिसरातील भागाचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. आगीचे नेमके तांत्रिक कारण अद्याप स्पष्ट झाले नसून टेस्टिंग टीमद्वारे तपास सुरू आहे.पर्यायी व्यवस्थेसाठी एक फिडर पेडगाव सब-स्टेशनवर हलवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी थोडा धीर धरून महावितरण कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे.. असे आवाहन करण्यात आले. सदर तांत्रिक विभागाची व्याप्ती व दुरुस्तीचे स्वरूप लक्षात घेता विद्युत पुरवठा पूर्णपणे पूर्ववत होण्यासाठी अपेक्षेपेक्षा अधिक कालावधी लागू शकतो. ग्राहकांची गैरसोय कमी करण्यासाठी उपलब्धतेनुसार टप्प्याटप्प्याने विद्युत पुरवठा सुरू करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
विविध ठिकाणचा वीस पुरवठा असा होईल सुरळीत
बसस्टँड परिसराचा वीजपुरवठा दुपारी ३ ते ३.३० वाजेपर्यंत पूर्ववत केला जात आहे. केवळ दर्गा रोड परिसराचा वीजपुरवठा जास्त बाधित राहणार असून, आज रात्री २ ते ३ वाजेपर्यंत किंवा सकाळी ६ वाजेपर्यंत पूर्ण वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे उद्दिष्ट असल्याचे महावितरण अधिकारी यांनी सांगितले.
दर्गा रोड, जुनापडगाव रोड परिसरातील ग्राहकांनी सहकार्य करावे
अचानक घडलेल्या या (Parbhani Mahavitaran fire) घटनेनंतर महावितरणचे वरिष्ठ अधिकारी आणि तीन ते चार पथके तातडीने दुरुस्तीच्या कामाला लागली आहेत. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून, महावितरण आणि प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठे नुकसान टळले आहे. शक्य तेवढ्या लवकर विद्युत पुरवठा सुरळीत होईल. त्यामुळे दर्गा रोड , जुना पेडगाव रोड परिसरातील ग्राहकांनी परिस्थिती समजून घेऊन महावितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. ही विनंती.
-प्रवीण दरोले, अधीक्षक अभियंता, महावितरण.