आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; शेतकऱ्यांच्या समस्या आणि उपाययोजनांवर होणार चर्चा
चिखली : खरीप हंगामातील पिकांचे नुकसान, अपुरा पाऊस आणि निर्माण झालेली दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर प्रभावी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आज, मंगळवार ३ नोव्हेंबर रोजी चिखली व बुलढाणा तालुक्यात महत्त्वपूर्ण आढावा बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या बैठका पार पडणार आहेत.
चिखली तालुक्याची बैठक सकाळी ११ वाजता तालुका क्रीडा संकुल, चिखली येथे आयोजित करण्यात आली आहे. तर बुलढाणा तालुक्याची बैठक दुपारी २ वाजता धाड येथील देशमुख टॉवर येथे होणार आहे.
या बैठकांमध्ये तालुक्यातील दुष्काळजन्य परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात येणार असून, शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, पिकांचे नुकसान, पाणीटंचाई तसेच शासनाच्या माध्यमातून आवश्यक असलेल्या मदत व उपाययोजनांबाबत चर्चा होणार आहे. स्थानिक पातळीवरील परिस्थिती जाणून घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आवश्यक बाबी शासनदरबारी मांडण्याच्या दृष्टीने या बैठकांना महत्त्व प्राप्त झाले आहे.
या महत्त्वपूर्ण बैठकांना महायुतीचे सर्व तालुकाध्यक्ष, पदाधिकारी, नेतेमंडळी तसेच संबंधित गावांतील आजी-माजी सरपंच यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी केले आहे.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यांच्या अडचणींच्या निराकरणासाठी या बैठकांमधून कोणत्या उपाययोजना पुढे येतात, याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.